सोलापूर : स्वर्गिय श्रीनिवास बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. २६ ते २८ जानेवारी या दरम्यान ऑफिसर्स क्लब येथील ३ कोर्टवर लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उल्हास सोनी यांनी दिली.
क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वर्गिय श्रीनिवास बी. सोनी पब्लिक ट्रस्टच्या वतीने अनेक सामाजिक आणि क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात येते, त्याचाच भाग म्हणून दि. २६ जानेवारीपासून लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गांधी नगर येथील ऑफिसर्स क्लब च्या तीन कोर्टवर या स्पर्धा सकाळी ७ वाजल्यापासून सुरू राहणार आहेत. याचे उदघाटन मातोश्री श्रीमती शीलादेवी श्री. सोनी यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी ०७ वाजता होणार आहे. क्रिकेटच्या आयपीएल प्रमाणे टेनिस स्पर्धेसाठी खेळाडू निवडून ४ टिम करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टिम मध्ये २८ खेळाडू असून डबल्सच्या ८४ मॅचेस होणार आहेत. या स्पर्धेसाठी मुख्य रेफरी म्हणून पुण्याच्या तेजल कुलकर्णी या काम पाहणार आहेत.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस ५० हजार रूपये, व्दितीय २५ हजार रूपये, तिसरे १० हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ हजार रूपयांचे बक्षिस ठेवण्यात आले असल्याचेही सोनी यांनी सांगितले. या स्पर्धेत १३ ते ८१ वर्ष वयाचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला जर्सी, टोपी, नॅपकिन्स असे किट देण्यात येणार असून चहा, नाष्टा, जेवण याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. खेळाडूंमधे खेळाडू प्रवृत्तीची वाढी होणे हे या स्पर्धेचे उद्दीष्ट आहे. या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडतील, यात शंका नाही.
या स्पर्धेचा समारोप रविवारी, २८ जानेवारी रोजी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुहास सोनी, विकास सोनी, अनुराधा गांधी, डॉ.शंतनु गांधी आणि सोनी परिवार परिश्रम घेत आहे.