सोलापूर : दक्षिण तालुक्यातील कासेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा पार पडली. ही ग्रामसभा गावातील रस्त्यावरील खड्डे गटारी, अरुंद रस्ते या विषयावर सुरू झाली. ती पुढे गांवातील मटक्याची आकडेमोड करीत गुटक्यात रंगली, अवैध वाहतूक विषयाला घेऊन धावत राहिली. पुढं विद्युत मंडळाला शॉक देत कथित मैदानावर चौखूर धावली. ही ग्रामसभेत दारुबंदी च्या विषयावर आभाळभर गुऱ्हाळ झाले. अशा एक-ना-अनेक विषयांवर रणकंदन झालं, या सभेत अनेक ठराव करण्यात झाले.
या ग्रामसभेला सरपंच यशपाल वाडकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चौगुले, गांव कामगार तलाठी आरिफ हुडेवाले, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.कॉ. एस. डी. ननवरे, मुख्याध्यापक बोधीप्रकाश गायकवाड, ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानोबा रोकडे, सदस्य पोपट जाधव, शहाजान शेख, संभाजी चौगुले, आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी-कर्मचारी आरोग्य यंत्रणेतील आशा कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या समस्यावर ग्रामसभेत चर्चा व्हावी, या समस्यांचा उकल होण्याचा मार्ग सोयीस्कृत होईल, या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांकडून लिखीत स्वरुपात अर्ज मागविले होते. या ग्रामसभेत प्रारंभी आलेल्या अर्जाचं वाचन व त्यावरील उपाययोजना या मंथनात प्रदीर्घ चाललेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाईवरील उपाययोजना, आरोग्य अवैध दारू विक्री अशा मुद्द्यावर प्रचंड वाक्:युद्ध अन् आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यानंतर आयत्यावेळी आलेल्या विषयांवरही ग्रामस्थ अन् ग्राम सचिवालयाच्या सत्ताधारी गटात घमासान झालं.