सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना ज्ञान, विज्ञान, धर्म, अध्यात्म या सर्व बाबींचा आधार घेत विकसित भारताचे स्वप्न साकार करावे लागणार आहे. संशोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडवून राष्ट्र निर्मितीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
कुलगुरू प्रा. महानवर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज आपण अनेक संधी आणि आव्हानांना सामोरे जात आहोत. आजचे उच्चशिक्षण हे आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या युगात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना नवीन भारताच्या निर्मितीचे संधी उपलब्ध करून देत आहे. युवकांना शिक्षणाच्या माध्यमातून अधिक कुशल आणि आधुनिक भारताचा विश्वकर्मा बनवण्यासाठीची जबाबदारी ही आता विद्यापीठांवर आली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून नीतिवान, गुणवान आणि सर्वगुणसंपन्न अशी पिढी निर्माण करण्याचे आपणास सौभाग्य लाभत आहे. आपले विद्यापीठ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कल्याणाचा आणि कुशल प्रशासनाचा वारसा घेत वाटचाल करत आहे. याच वाटेवरून आपणास अधिक वेगाने पुढे जायचे आहे, असे ही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना शिक्षण संशोधन कला क्रीडा आणि आरोग्य या सर्व सुविधा उत्तम देऊन त्यांना अधिक क्षमतावान बनवण्याचा माझा प्रयत्न राहील, असे ही कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो ओळी :
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी ध्वज फडकविला.