Type Here to Get Search Results !

सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून गुणीजनांचा सन्मान : सुशीलकुमार शिंदे


पारंपारिक बाराबंदी, पगडी घालून, नंदीध्वज देऊन सत्कार

सोलापूर :

सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.  तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे श्री श्री श्री १००८ जगदगुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी होते.


आपल्या क्षेत्रात काम करताना समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्यांचा सन्मान करणे योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्यतत्पर अधिकारी, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने  सोन्नलगी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली त्याचा आनंद आहे, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.



 समाजात निस्वार्थ काम करून समाजाची सेवा करणाऱ्यांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो, माजी आमदार बाबुराव चाकोते यांचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि त्यांचे परिवाराने सुरू ठेवला आहे हे विशेष आहे. असे आर्शीवचन काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्या नंतर विश्वशंकर चाकोते यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलून सोलापूरमध्ये अनेक गुणवंत आहेत, त्यांचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वशंकर चाकोते यांनी सांगितले.



सोलापूरच्या विकासासाठी माजी आमदार बाबुराव चाकोते आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच सोलापूरला आज पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनी ते सोलापूर पहिली पाईपलाईन शिंदे यांनीच आणली. आता लोकसंख्या वाढत असल्याने पुन्हा दुसऱ्या पाईपलाईनसाठीही निधीची तरतूद शिंदे यांनी केली आहे, हे व्हिजन असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच सोलापूरचा विकास झाला आहे, असे माजी आमदार, माजी महापौर विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रिडा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सोन्नलगी रत्न पुरस्कार उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांना देण्यात आला. दमाणी यांच्या लग्नाला ७० वर्ष झाले त्यानिमित्त काशीजगदगुरू आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दमाणी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सोन्नलगी गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांना देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सोन्नलगी सरस्वती पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर सोन्नलगी धन्वंतरी पुरस्कार आहारतज्ञ सोनाली घोंगडे यांना तर सोन्नलगी अन्नपुर्णा पुरस्कार रॉबीनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे यांना देण्यात आला. 

सत्कारमुर्तींच्या अंगावर पारंपारिक बाराबंदी घालण्यात आली आणि विशेष म्हणजे सत्कार करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पाहुण्यांनी अंगावर बाराबंदी पोषाख घातला होता. शाल श्रीफळ, पुष्पहार, डोक्यावर पगडी, स्मृती चिन्ह आणि प्रतिकात्मक नंदीध्वज देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.



आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरमध्ये जे जे विकास झाले ते सर्व सुशीलकुमार शिंदे यांनीच केले. सोलापूरमध्ये आयटी पार्क आणि विमानसेवा यायला पाहिजे, असेही त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामधून स्वर्गिय बाबुराव चाकोते यांनी सोलापूरच्या शेतकऱ्यापासून कामगारांपर्यत विकासाची गंगा कशी पोहोचवली, याची माहिती सांगितली. 

तृप्ती अंधारे यांनी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन या पुरस्काराने मिळाले असल्याचे सांगितले तर आहार तज्ञ सोनाली घोंगडे यांनी चांगले आहार हे चांगली पिढी घडवते, असे आपल्या मनोगतामधून सांगितले. या कार्यक्रमात स्वागत गीत आणि समारोपाचे गीत वीणा बादरायणी यांनी गायले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. शेवटी आभार विश्वराज चाकोते यांनी व्यक्त केले. 



या कार्यक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सुप्रिता विश्वनाथ चाकोते, नम्रता चाकोते, पद्मावती चाकोते, भिमाशंकर चाकोते, रंजिता चाकोते, पुष्पा मदन चाकोते, भिमाशंकर बिराजदार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, अशोक भिंगारे, चंद्रशेखर नागणसुरे, डॉ. नसिमा पठाण, सरस्वती चाकोते प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा पवार, प्रिस्कीला गायकवाड, मल्लिकार्जुन गुरव, सिध्देश्वर कणगी, निलकंठप्पा कोनापुरे, राजेंद्र मायनाळ, केदार उंबरजे, रेणसिध्द अवजे, संगम रघोजी,प्रभाकर विभुते, वैभव बरबडे, दशरथ वडतिले, चन्नवीर दुलंगे, बाळासाहेब माडेकर, बसवराज रोडगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.



चौकट -

सोन्नलगी पुरस्कार कार्यक्रमात 

विमानसेवा अन् आयटी पार्कची मागणी

चाकोते परिवाराच्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण होत असताना पुरस्कारप्राप्त उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरला पहिल्यांदा आल्यानंतर आणि आता अनेक बदल झाले. इतर शहरे मोठ्या प्रमाणात पुढे गेलेले आहेत परंतु सोलापूरला पुण्याला जसे हिंजवडी आहे तसेच सोलापूरला आयटी पार्क आणि विमानसेवा आवश्यक आहे अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर केली.

..... चौकट ......

विश्वनाथ चाकोते उत्साहाचे झाड : सुशीलकुमार शिंदे

विश्वनाथ चाकोते यांनी एक मनात पक्कं केलं की, ते पूर्ण करतातच ते उत्साहाचे झाडच आहे. प्रचंड उर्जावान व्यक्तीमत्व आहे, असे गौरवोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.