रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी नियोजित आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी, रे नगर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, रे नगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार किरण जमदाडे, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ठेकेदार अंकुर पंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभा स्थळाची पाहणी तसेच नागरिक येण्या जाण्याचे मार्ग, पार्किंग व्यवस्थाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभास्थळ हेलीपॅड तसेच लाभार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे रस्त्यांची पाहणी करून संबंधितांना करावयाच्या दुरुस्तीबाबत निर्देश दिले.
प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली तर ठेकेदार अंकुर पंदे यांनी प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली.