Type Here to Get Search Results !

वरळेगांव येथे राम देवकर विचार मंच दिनदर्शिकेचे प्रकाशन



कासेगांव/ संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगांव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय राम देवकर विचार मंचचे दिनदर्शिकेचे प्रकाशन पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वर्गीय राम देवकर यांच्या सामाजिक राजकीय व आध्यात्मिक कार्याची माहिती त्यांचे नातू बिभीषण देवकर व सुनील देवकर यांच्याकडून घेतली, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. 

याप्रसंगी तालुका पोलीस स्टेशनचे पोउनि निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल माघाडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस टाईम चे मुख्य संपादक उमेश काळे, विचार मंचाचे संस्थापक बिभीषण देवकर व सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थापक बिभीषण देवकर यांनी या विचार मंचाच्या दिनदर्शिकेविषय की, या दिनदर्शिकेमध्ये १० गांवच्या यात्रा-जत्रा तारखेसह नमूद करण्यात आल्या आहेत, अशी संकल्पना राबवणारी ही पंचक्रोशीतील पहिली दिनदर्शिका आहे. त्याचबरोबर वर्षभरामध्ये या विचार मंचाच्या माध्यमातून राबवले जाणारे सामाजिक उपक्रम हे देखील यामध्ये नमूद केले आहेत. 

विचार मंच राबवित असलेले सामाजिक उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढावी, व गरजू लोकांसाठी कार्य करणाऱ्या लोकांचे प्रोत्साहन वाढावे, ही माफक इच्छा आहे, असेही बिभीषण देवकर यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर यांनी देखील विचार मंचाच्या माध्यमातून आम्ही 'रक्तदान शिबिर' ,'आधार कार्ड' 'आयुष्यमान भारत योजना कार्ड' 'वृक्षारोपण'.. असे विविध उपक्रम राबवून आम्ही आमच्या आजोबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र पोलीस टाईम चे मुख्य संपादक उमेश काळे यांनी देखील या विचार मंचाच्या दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या.