सोलापूर : २०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट घोषणा अन् स्मार्ट विचारांचा वारू चौफेर उधळू लागला. त्या विचारांतूनच देशातील शंभर स्मार्ट सिटींचा विचार उदयास आला. देशभरात शंभर स्मार्ट सिटी चे सनई-चौघडे वाजत असताना, 'स्मार्ट सिटी, सुंदर शहर' घोषणांच्या भाऊ गर्दीत, सुंदर शहराचा विद्रूप चेहरा नेहमीच सामान्यांच्या दृष्टीसमोर येतो. शहरातील डॉ. किडवाई चौक ते बेगम पेठ पोलीस चौकी मार्गावर ड्रेनेज लाईनच्या दुर्गंधीयुक्त पाणी वाहण्याचा विद्रुपपणा शुक्रवारी नागरिकांच्या प्रत्ययास आलाय.
सोलापुरातील प्रमुख रस्ता, अशी ओळख असलेला शिवछत्रपती रंगभवन ते मधला मारुती रस्ता या मार्गाकडं प्रमुख बाजारपेठेचा परिसर म्हणून गणला जातो. या बाजारपेठेत प्रमुख प्रार्थनास्थळं, नामांकित उपहारगृहे आहेत, या रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बेगम पेठ पोलीस चौकी आहे. या मार्गावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ट्रेझरीकडं जाणारे नागरिक याच मार्गावरुन जातात.
या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, छोटे-मोठे विद्यार्थीही सोशल-पानगल शाळांकडे याच मार्गावरून त्या-त्या शिक्षण संस्थांकडं जातात. ज्यावेळी असं दुर्गंधीयुक्त घाण पाणी प्रार्थनास्थळाला वळसा घालत मुख्य मुख्य रस्त्यावरून वाहू लागतं, तो विद्यार्थ्यांसाठी कसरतीचा क्षण असतो. अशी विदारक स्थिती पाहिल्यावर नागरिक स्मार्ट स्वप्नांचा स्वप्न भंग झाल्याचा क्षण अनुभवतात.
केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांचा स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली, कोठ्यावधी रुपयांचा निधी दिला. सुंदर शहराचं चित्र रेखाटत कामंही सुरू झाली, मात्र त्यातील किती कामं पूर्णत्वास गेली, हा न उलगडलेला सवाल आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घोषणेत स्मार्ट सिटी सूचित सोलापूर ६३ व्या स्थानावर असल्याचं सांगण्यात आलंय.
शुक्रवारी, सकाळी किडवाई चौक-बेगमपेठ पोलीस चौकी मार्गावर आलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढताना, अनेकांना कसरत करावी लागत होती. हे काम ठेकेदारामुळे मागील महिण्यापासून रखडले आहे.त्यामुळंच 'रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता' हेच अनाकलनिय आहे. इथला कटू अनुभव घेतलेला सामान्य नागरिक सुंदर शहराचा विद्रुप चेहरा पाहतात. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी या रस्त्याकडं डोळसपणे पाहणं गरजेचं असल्याची भावना या भागातील नागरिकांतून व्यक्त करण्यात आलीय.