सोलापूर : आमदार रोहित पवार यांनी यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेमुळे राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संघर्ष यात्रेमुळे महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होऊ लागल्याने,बारामती अॅग्रोला इडीच्या माध्यमातून नोटीस देऊन आमदार रोहित पवार यांना चौकशीकरिता बोलावलेले असल्याचा आरोप करीत सोलापूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ०४ हुतात्मा पुतळा चौकात बुधवारी, आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा हल्ली राज्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी ठरली आहे. आमदार पवार यांनी युवकांच्या ज्वलंत समस्यांना स्पर्श केल्याने राज्यातील बेरोजगारीची दाहकता सामान्यांपुढं आलीय. युवा संघर्ष यात्रेला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी वर्तुळात अस्वस्थता आहे. त्यातूनच बारामती अॅग्रोला नोटीस बजावून आमदार पवार यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलताना म्हटले.
हल्ली इडी केवळ विरोधकांना आपल्या पक्षात खेचण्याचा गळ म्हणून वापरण्यात येतेय. सत्ताधाऱ्यांनीच आरोप करायचे, इडीची नोटीस बजावायची, त्यास घाबरुन जो सत्ताधारी मंडळीत जातो, त्याच्यावरील सर्व आरोप धुतले जातात. हे राज्याने व देशातील जनतेने अनुभवलंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा पक्ष वॉशिंग मशिन आहे काय ? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार रोहित पवार यांच्यासोबतच भक्कमपणे राहणार आहोत. इडी सरकारचा आम्ही निषेध करतोय, असं सांगून सत्ताधारी मंडळींच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊन हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, ज्येष्ठ नेते दिनेश शिंदे, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, युवक शहराध्यक्ष सरफराज शेख, प्रतीक्षा चव्हाण, जावेद शिकलकर, मध्य अध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला, दक्षिण विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, विजय भोईटे, अक्षय जाधव, बिराप्पा बंडगर, लखन गावडे, समर्थ लवटे, राहुल भालेराव, ओम आदलिंगे, विनायक आदर्श उडानशिवे उत्तर अक्षय जाधव, आदर्श उडाणशिवे, महेश शावळकर, अभी कांबळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.