दिपक नाईकनवरे राजस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर : मला माझ्या पंढरपूरचे आई-वडिलांचे, मोठ्या बंधूचे व सर्व मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असल्यामुळे हे शक्य झाले, पुढे देखिल क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, कला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक यशस्वी आणि उत्तम कामगिरी करणार असल्याचा विश्वास दिपक नाईकनवरे यांनी व्यक्त केला.
क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पंढरीचे सुपुत्र दिपक राजाराम नाईकनवरे यांनी पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोविला आहे. दिपक नाईकनवरे आतापर्यंत अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यातच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कलारत्न/क्रीडारत्न पुरस्काराचे यंदाचे मानकरी दिपक नाईकनवरे ठरले आहेत. यामध्ये त्यांना सन्मानपत्र, आकर्षक ट्रॉफी, मानाचा फेटा, शाल देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी दिपक नाईकनवरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, मायकल वॉन, बिली बाऊंडन यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी दखल घेतलेले आतपर्यंतचे सर्वात लोकप्रिय क्रिकेट अंपायर म्हणून दिपक नाईकनवरे यांची संपूर्ण भारत देशभर ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग करण्याची इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे दिपक नाईकनवरे यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.