Type Here to Get Search Results !

उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील




 उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची पुणे येथे बैठक संपन्न

सोलापूर : ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश गुरूवारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते.



गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळ्यापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगून, आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.

उजनी प्रकल्पात सध्या ५.३४ टीएमसी (९.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठी आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र २ लाख ५४ हजार २५३ हेक्टर (८४.५० टक्के) होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

अधीक्षक अभियंता धिरज साळी यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. माढ्याचे आमदार बबन शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले  हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.