"स्त्री ही संस्काराची खाण असते, ती ध्येयाने प्रेरित झाली तर समाजव्यवस्था बदलू शकते, तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला विविध भुमिकेतून वावरावे लागते. तिच्या सहवासातील प्रत्येक नाती ती बळकट करु शकते. अश्याच महान आदर्शवत जिजाऊंचा आज जन्मोत्सव."
...
१२ जानेवारी १५९८ रोजी निजामशाहीतील मातब्बर सरदार लखूजीराजे जाधव आणि म्हाळसाराणी यांना दत्ताजी, अचलोजी, बहादूरजी आणि रघोजी यांच्या पाठीवर कन्यारत्न झाले. याच त्या राष्ट्रमाता "जिजाऊ" बालपणातच पराक्रमी बंधूं सोबतच त्या ही सर्व शस्त्र विद्येत पारंगत झाल्या पिता आणि काका जगदेव राजे यांच्या सोबत दरबारी रितीरिवाजाची धडे गिरवले. जाधव घराण्याचा सिंदखेडराजा परिसरात दबदबा होता, लोकांना आपलंसं वाटणार हे घराणं होतं.
राजे ही रयतेवर पुत्रवत प्रेम करत होते. म्हाळसाराणींच माहेर फलटणच निंबाळकर आणि मालोजीराजे यांच्या पत्नी उमाऊ या ही फलटणच्या निंबाळकर घराण्यातीलच. वेरुळचे भोसले, सिंदखेडराजाचे जाधव आणि फलटणचे निंबाळकर ही तोलामोलाची घराणी. वणगोजीराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह दौलताबादच्या किल्ल्यात संपन्न झाला.
पराक्रमी घराण्याचा वारसा मुळे जिजाऊ आपल्या सहवासातील प्रत्येक नात्याला एका उंचीवर घेऊन गेल्या. मायबाप म्हणून म्हाळसा राणी आणि लखुजीराजेंच नाव अजरामर केल्या, शहाजीराजेंची स्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पत्नी म्हणून संपूर्ण साथ दिली. आदर्श आणि प्रेरणादायी दांपत्य म्हणून अढळ स्थान प्राप्त केले. पतीच्या संकल्पनेतील नव्या शासन व्यवस्थेची बांधणी या पत्नीन आपल्या दोन सुपुत्रा मध्ये बालपणापासूनच करत होत्या.
थोरले पुत्र संभाजीराजेंच्या अकाली निधनाने बेंगळुरूच राज्य दिर्घकाळ अस्तित्वात नाही आलं पण शिवबाच्या माध्यमातून स्वराज्य उभं केल्या. एक नितीवंत , किर्तीवंत पराक्रमी पुत्र आणि आईविना पोरका झालेल्या नातवास म्हणजेच शंभूराजेंना ही चारित्र्य संपन्न, बुद्धीवान, धाडसी, पराक्रमी घडविल्या या रक्ताच्या नात्या बरोबरच हजारो मावळ्यांशी जपलेली नाती वेगळीच. उभ्या आयुष्यात हजारो वर्षे गौरवानी उल्लेख व्हावा असे संस्कार जिजाऊनी घडविल्या. हे घडत असताना अनेक संकटं आली पण ध्येय निश्चित असल्याने या संकटांना धीराने सामोऱ्या गेल्या.
सामान्य रयत शाहयांच्या परस्पर आक्रमणांनी होरपळी जात होती. वतनदारांची दांडगाई वेगळीच होती. या लढ्यात अनेक पिढ्या खर्ची पडत होती. विना तक्रार हे चालू होत. याच काळात त्यांना स्व:त्वाची जाणीव करून देवून त्यांचा आत्मभान जागृत करण्याचे काम शहाजीराजे आणि जिजाऊंनी केले. बेंगळूर आणि पुणे येथे स्वतंत्र राज्यकारभाराचा मुहूर्त मेढ रोवला. स्वराज्याची निशाणी, राजमुद्रा आणि पराक्रमी, मातब्बर, निष्ठावान सरदारांना सोबत घेऊन जिजाऊ बाल शिवबासह आपल्या बेचिराख झालेल्या जहागीरीत आल्या.
शहाजीराजे कर्नाटकात असताना आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांनी पुणे बेचिराख केला होता. गावाच्या वेशीवर तुटकी पार रोवून त्याला चप्पल लटकवले होते. हे कोणी हटवल्यास त्याचा वंश बुडणार अशी आवई उठवली होती. या भितीपोटी लोक पुण्यापासून कोसो दूर गेले होते. मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेले हे गाव उध्वस्त झाल होतं. जिजाऊंनी ती रोवलेली पार उखडून टाकली आणि सोन्याच्या फाळाने ती जमीन नांगरली. आणि पुणे वसवलं.
जगाला वंदनीय ठरेल, असा स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. वाड्या-वस्त्यावरील तरुण मावळे. मातब्बर सरदारांना स्वराज्य कार्यात सहभागी करून घेतले. एकामागून एक गडकिल्ले ताब्यात घेतले. स्वराज्य बहरु लागलं. आदिलशाहाला भविष्यातील संकट जाणवू लागले. आदिलशाहीत राहून शिवरायांना मदत करत आहात, हा आरोप करुन शहाजीराजेंना कैद करण्यात आली. स्वराज्य बाळस धरत असतानाच हे संकट कोसळेल. पण अशा संकटांनी खचणाऱ्या जिजाऊ थोड्याच सामान्य होत्या. जिजाऊ संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांनी एक चाल खेळली. दिल्लीच्या शाहजान बादशहास एक पत्र तयार करण्यात आले. 'आम्ही दोघं बंधू मुघलशाहीत दाखल होत आहोत.
या बदल्यात आदिलशाहीवर हल्ला करून शहाजीराजांची सुटका करण्यास आम्हास सहकार्य करावे.' हे पत्र दिल्लीस पोहचण्या ऐवजी विजापूरास पोहचण्याची व्यवस्था करण्यात आली. ठरल्याप्रमाणे पत्र आदिलशाहास प्राप्त झाले. बादशहाच्या पायाखालची जमीन सरकली. शहाजीराजेंची सुटका करून परत त्यांना सन्मानाने बेंगळुर येथील जहागीर बहाल करण्यात आली. रक्ताचा एक थेंब ही न सांडता ही लढाई जिंकली होती. अशा प्रकारचा पराक्रम इतिहासात नोंद घ्यावी असं आहे. याच पद्धतीने अफजलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती, पेडगावचा गड, आग्र्याहून सुटका अशा अनेक पराक्रमांची नोंद झाली आहे.
जिजाऊंच स्वतःचं हेर खातं होतं. यात अनेक स्त्रिया देखील होत्या. पाचशे हून अधिक महिलांच सशस्त्र सैन्य दल ही होत. मुलखातील उत्सव, लग्न, समारंभात आपल्या या फौजेनिशी जिजाऊ उपस्थित रहात होते. शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना सेनापती नेताजी पालकर हे लांबच्या कामगिरीत अडकले होते अशा प्रसंगी जिजाऊ आपल्या सैन्य दलासह पन्हाळगडावर धडकल्या होत्या. अफजलखान वाई प्रांतात होता तेव्हा जिजाऊ तेथे जाऊन जरब बसविल्या होत्या. शिवराय सतत स्वारीवर असतं, तेव्हा जिजाऊ स्वतः राज्यकारभार पाहत, पत्रव्यवहार सांभाळत, मोहिमांच्या आखणी करत. लढ्यात कामी आलेल्या सैन्याच्या घरी जाऊन सांत्वन करत आणि पुढच्या पिढीची तजबीज करत. सैन्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पोटच्या पोरांसारखी काळजी घेत.
शुन्यातून स्वराज्य उभा राहिला आपला पुत्र सार्वभौम राजा झाला. पतीला दिलेला शब्द पाळला शिवराय छत्रपती झाले. राजाभिषेक संपन्न झाला आणि बाराव्या दिवशी १७ जून १६७४ रोजी छत्रपतीसह स्वराज्याला पोरकं करून जगाचा निरोप घेतला. विदर्भात जन्म झाला. कर्नाटकात स्वराज्याच संकल्प केला. पश्चिम महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाला आणि कोकणात स्वराज्य पुर्णत्वास आला.
आज जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने आपण ही जिजाऊंची प्रेरणा घेऊन आपल्या सहजीवनाच्या टप्प्यावर प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या... !
शिवश्री राम गायकवाड, मराठा सेवा संघ सोलापूर.