मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी अल्पसंख्यांक विभागाच्या नूतन कार्यकारिणी नियुक्ती प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. उपमुख्यमंत्री पवार एकनिष्ठ असल्याने व येणाऱ्या निवङणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी तसेच पक्ष बळकट करण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तत्पूर्वी अजित पवार यांची अत्यंत निकटवर्तीय कट्टर समर्थक उमेश पाटील यांची पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.
या निवडीचे अधिकृत पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते उमेश पाटील यांना यावेळी प्रदान करण्यात आले.
तद्नंतर सोलापूर शहरच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी अमिर शेख यांची कार्याध्यक्षपदी रियाज शेख तसेच अल्पसंख्यांक विभाग शहराच्या समन्वयकपदी संजय मोरे यांची निवङ करण्यात आली. या निवडीची नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अल्पसंख्यांक नूतन शहराध्यक्ष अमिर शेख, कार्याध्यक्ष रियाज शेख व समन्वयक संजय मोरे यांना प्रदान करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर मंत्री हसन मुश्रीफ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, नूतन मुख्य राज्य प्रवक्ते उमेश पाटील,अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य पक्ष निरीक्षक नजीम मुल्ला, प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या निवड प्रक्रियेबद्दल सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच सर्वच फ्रंटल सेलच्या वतीने राज्याचे नूतन मुख्य प्रवक्ते उमेश पाटील व अल्पसंख्यांक विभागचे नूतन शहराध्यक्ष अमिर शेख, कार्याध्यक्ष रियाज शेख व समन्वयक संजय मोरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुस्लिम समाजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रामुख्याने सर्वच घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस असून विविध विकास कामांसाठी भरगच्च असा निधी देऊ, असे जाहीर केले. विरोधकांना टीका करु द्या, आपण त्यांना कामातून उत्तर देऊ, असंही त्यांनी शेवटी सांगितले.