सोलापूर/पंढरपूर : उंदरगाव ते चव्हाणवाडी येथील सीना नदीवरील पुलाचे काम संबंधित कंत्राटदारांनी ११ महिन्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण करावे. सदर पुलाचा लोकार्पण सोहळा मार्च २०२५ मध्ये होईल या दृष्टीने आवश्यक यांत्रिक सामग्री व ज्यादा मनुष्य बळाचा वापर करून वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.
उंदरगाव ते चव्हाणवाडी रस्ता क्रमांक ७१ वर सीना नदीवरील पुलाचे भूमिपूजन व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी मनीष सुळे, कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री डॉ.सावंत म्हणाले,उंदरगाव ते चव्हाणवाडी येथील सीना नदीवरील पुलामुळे संबंधित गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. माढा तालुक्यातील वाकाव गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेत जमीन ही नदीपलीकडे असल्याने त्यांना शेती करण्यासाठी पर्यायी व लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे. या पुलामुळे त्यांचा वेळ व अंतर वाचणार आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना ( श्रेणी-१) नूतन इमारतीत पशु पालकांना जनावरांच्या उपचारासाठी अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणार आहेत.
राज्यात आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी. राज्यातील साडे बारा कोटी जनतेचे आरोग्य सुदृढ व वैचारिक दृष्ट्या चांगले हवे, यासाठी मोफत उपचार सुरू केले. राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात आता तीन ते चार पट ओपीडी वाढल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्याच बरोबर राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुरक्षित व सुदृढ राहावे, ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी' राईट टू हेल्थ' हा नवीन कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागामार्फत आषाढी व कार्तिकी वारीत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना व भाविकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध केल्याने सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याचे डॉ.सावंत यावेळी सांगितले.
यावेळी सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचा आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.