सोलापूर : अयोध्येत होऊ घातलेला श्रीराम प्राण प्रतिष्ठा दिन- २०२४ सोमवारी, २२ जानेवारी रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात देशभरात सर्वात मोठ्या उत्सव म्हणून साजरा होतोय. या प्राण-प्रतिष्ठा दिनाच्या अनुषंगाने सोलापूर पोलीस आयुक्तालयात शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी शांतता कमिटी सदस्य व समाजसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या शंकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी निरसन करताना, शहरात ठेवण्यात आलेल्या चोख बंदोबस्ताची माहिती दिली.
पोलीस आयुक्तालयात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहाय्यक पोलिस आयुक्त तोरडमल यांनी प्रास्ताविक करताना या बैठक आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. त्याचवेळी त्यांनी उपस्थित सदस्यांच्या काही सूचना असल्यास त्या मांडण्याची ही आवाहन केले. त्यावर उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी त्यांच्या समस्या व सूचना मांडल्या.
त्यानंतर, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे तसेच पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, यांनी, बैठकीतील उपस्थित सदस्यांना, श्रीराम प्राण प्रतिष्ठा - २०२४ चे अनुषंगाने, मार्गर्शन केले. त्याचबरोबर बैठकीस उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचना व अडी अडचणीचे निरसन केले.
सोमवारी, २२ जानेवारी रोजी रोजी श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिनाचे दिवशी, काही समाजकंटकांनी, शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, शांतता समितीचे सदस्यांनी अशा समाजकंटकांना समजावून सांगण्याचेही आवाहन पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे यांनी केले. त्याचबरोबर उत्सव साजरा करताना, समाजकंटकांकडून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच, सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होऊन, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास, त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळविण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्तानी यावेळी केले.
श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिनाचे निमित्ताने सोमवारी, २२ जानेवारी रोजी सोलापूर शहरामध्ये, पोलीसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात आला असून, या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस घेतील अशी ग्वाही पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे यांनी जमलेल्या सदस्यांना दिली. त्यानंतर, बैठकीस उपस्थितांचे आभार मानून, बैठकीची सांगता करण्यात आली.
या बैठकीस पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन, विभाग-१, विभाग-२, वाहतुक शाखा, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते.