सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव बुधवारी, ०३ व ०४ जानेवारी रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विद्यापीठ संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण ४५० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून यावेळी त्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी, ०३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. ‘डीआरडीओ’चे माजी संचालक डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांत महाविद्यालय स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सव पार पडले. यातून ४५० विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील अविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झालेली आहे.
हा अविष्कार संशोधन महोत्सव महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियमानुसार आयोजित केला जात आहे. विद्यापीठ स्तरीयमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड केली जाणार आहे. यात पदवी, पदव्युत्तर पदवी व तसेच पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असं कुलगुरु डॉ. महानवर यांनी सांगितले.
महोत्सवाचा समारोप समारंभ गुरुवारी, ०४ जानेवारी रोजी सायंकाळी ०४ वा. होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर तथा सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे डायरेक्टर अमित जैन यांची उपस्थिती राहणार आहे. या संशोधन महोत्सवामध्ये ०६ विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
यामध्ये ह्युमॅनिटीज लॅन्ग्वेजेस अँड फायनआर्ट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्सेस, एग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मेडिसिन अँड फार्मसी या सहा विभागांचा समावेश आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच. डी च्या प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे तीन अशा एकूण ४८ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यातून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय संशोधन महोत्सव १२ ते १५ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे होणार असल्याचेही कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
यावर्षी प्रथमच विद्यापीठस्तरीय अविष्कार हा विद्यापीठ परिसरातच आयोजित असल्यामुळे एकाच मंडपामध्ये सर्व डिसिप्लिनच्या विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन हे एका छताखाली करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अविष्कार महोत्सवासाठी ज्यांनी-ज्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे, त्यांचा विशेष सत्कार होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसुद्धा केले जाणार आहे. तसेच, ०३ जानेवारी रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.