सोलापूर : ०३ ते १२ जानेवारी या कालावधीत कास्ट्राईब शिक्षक संघटना, सोलापूर व जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर व ऊमाई सामाजिक बहुद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जयंती महोत्सव २०२४ राष्ट्रमाता लेकी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक/गुणवंत डॉक्टर/गुणवंत पत्रकार/गुणवंत जि. प. कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
०६ डिसेंबर, २०२३ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रमाता जयंतीची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त, १० डिसेंबर रोजी महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबीर नेहरूनगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल, सोलापूर च्या जिल्हाध्यक्ष वैशाली उबाळे होत्या.
पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त, १८ ते २२ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात शालेय पातळीवर करण्यात आले होते, असंही जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी प्रारंभी म्हटले.
राष्ट्रमाता जयंती निमित्त,रविवारी ०७ जानेवारी रोजी सकाळी १० वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात राष्ट्रमाता लेकी/क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक/गुणवंत डॉक्टर/गुणवंत पत्रकार/गुणवंत जि. प. कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी वक्ते आयु. तुकाराम जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष रविन्द्र पालवे, तर आ. प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश हसापुरे, गोंदिया जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कादर शेख, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (प्राथमिक) प्रसाद मिरकले आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांना सावित्रीची लेक, फातिमा की बेटी, जिजाऊची लेक असे स्वतंत्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आदर्शवत काम केलेल्या मान्यवरांना वरील विषयाप्रमाणे सन्मानित करण्यात येणार आहे, असं कोरे यांनी शेवटी म्हटलं आहे.
या पत्रकार परिषदेस जि.प.बहुजन प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था जिल्हा सोलापूर,चे चेअरमन तथा जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, ऊमाई सामाजिक संस्था, सोलापूरच्या अध्यक्षा अर्चना राठोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा महिला प्रतिनिधी संगीता पाटील, अक्कलकोट तालुका सचिव शिवानंद कोळी, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष अंबरीश गोसावी आणि राहुल राठोड उपस्थित होते.