सोलापूर : मुलाच्या सततच्या तक्रारी, अभ्यास न करण्याच्या सवयीला कंटाळलेल्या बापानं आपल्या काळजाच्या तुकड्याची विषप्रयोगाने हत्या केलीय. ही खळबळजनक घटना सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ दि. १३ जानेवारीच्या रात्री घडलीय. या प्रकरणी विजय सिद्राम बट्टू (वय-४३ वर्ष) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एका मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात यासंबंधी नोंद झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर काही विसंगत माहिती पुढे आली त्यातच मृताची आई सौ. किर्ती विजय बट्टू (वय - ३३ वर्षे, रा. १०/५७/६०, भवानी पेठ, सोलापूर) हिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती विजय बटू याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुलगा विशाल, घरात व शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल पाहतो, याचा राग मनात धरुन निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेऊन जावून त्यास थम्स अपमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजून जिवे ठार मारल्याचा उल्लेख आहे. पोलिस निरीक्षक जगताप या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.