सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील मौजे खेड भाळवणी येथील जमीन गट क्र. २५१ / १ मध्ये महार वतनातील क्षेत्र कमी करुन श्री मारूती देव तर्फे रयत लावण्यात आले असून महार वतनाची जमीन त्रयस्थ संस्था अथवा इसमाच्या नावे करता येत नसल्याने २५१ / १ मध्ये श्री मारूती देव तर्फे रयत हे नाव कमी करून वारसदार बाबर यांची नावे नोंद होऊन मिळण्याच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजीपासून सुनिल दशरथ बाबर आणि इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरु केलंय.
या प्रकरणी सुनिल दशरथ बाबर (रा. महाळुंग, ता. माळशिरस यांनी पंढरपूर तहसील कार्यालयानंतर गतवर्षी, ०३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अर्ज देऊन खेड भाळवणी येथील जमीन गट क्र. २५१, २५१(१) संदर्भात वारसदार समस्त महार(बाबर) त्यांची नांवे लावण्याची मागणी केली होती.
या अर्जात २५१/१ मध्ये श्री मारूती देव तर्फे रयत असं लावलेलं नांव कमी करून वारसदार बाबर यांच्या नावाची नोंद होण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयानं सविस्तर चौकशी करून प्रचलित शासन नियम तसेच कायदेशीर तरतुदीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे पंढरपूर तहसील कार्यालयाला सूचित केले होतं, मात्र तहसील कार्यालयानं कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ हे अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय.