सोलापूर/ १४: सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी व पोलीस विभाग यांच्यात परस्पर चांगला समन्वय असला पाहिजे. हाच समन्वय निवडणूक यशस्वी होण्यासाठी महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पोलीस उप आयुक्त अजित बिऱ्हाडे, मनपा उपायुक्त निखिल मोरे, सर्व सहायक निवडणूक अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यात एकूण 3 हजार 599 मतदान केंद्र असून मागील लोकसभा निवडणुकीमध्ये एकही व्हलनेरबेल मतदान केंद्र नव्हते. यावेळी अशा मतदान केंद्राबाबत महसूल व पोलीस विभागाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करावी व त्याची यादी तयार करून ठेवावी. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने कलम 107, 110 च्या प्रलंबित केसेस त्वरित निकाली काढाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीत त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्या जबाबदारी विषयी माहिती घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थितपणे कामकाज करावे. पोलीस विभागाने सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच क्रिटिकल मतदान केंद्राबाबत अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.
निवडणूक विभागाने जिल्ह्यातील सर्व सेक्टरच्या याद्या पोलीस विभागाला उपलब्ध करून द्याव्यात. त्यानुसार लवकरच सर्व सेक्टर अधिकाऱ्यांच्या नियुक्ती पोलीस विभागाकडून करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. निवडणूक कालावधीत सर्व मतदान केंद्रावर तसेच दोन्ही लोकसभा मतदारसंघात पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येईल असे सांगून सर्व विभागात चांगले सहकार्य राहील, असे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
सर्व नोडल ऑफिसर यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. निवडणूक कामकाज करत असताना विषय समजून शांतेत काम करावे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व नोडल अधिकारी यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.