Type Here to Get Search Results !

लिंगायत भवनसह अन्य प्रश्नांवर मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावू : उपमुख्यमंत्री अजित पवार


सोलापूर : लिंगायत भवन, महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ त्याकरिता आपणास निमंत्रण असेल, त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सोमवारी पुण्यातील शासकीय विश्रामधामात लिंगायत भवनच्या निधी, दुहेरी पाईपलाईन आणि महात्मा बसवेश्वर स्मारक आदी प्रश्नावर चर्चेसाठी माजी आमदार रविकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.  या भेटीत सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी उपमुख्यमंत्र्यांशी उभयतांनी प्रदीर्घ चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते माजी आमदार रविकांत पाटील आणि सद्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी या भेटीत नविन वर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

यापूर्वी लिंगायत भवनसाठी आपण जो ७० लाखाचा निधी मंजूर केला होता, त्यासाठी आपले धन्यवाद ! त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी ०१ कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजनमधून लिंगायत भवन साठी मंजूर केला होता, परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती केली. त्यास उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमचे प्रत्येक काम मार्गी लावले जाईल, मुंबईला भेटायला येण्याचं निमंत्रणही उभयतांना दिले.

या चर्चेत अजित पवार यांनी, आपण सांगाल ते कामे मार्गी लावून देतो, आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडा न् खडा माहीती आहे. आपल्या पुढाकारातून  सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल, असं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी उभयतांना आश्वस्त केलं.

याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते.