पालकमंत्र्यांच्या हस्ते जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन
बँकांनी सिबिल खराब असल्याने गृह कर्ज नाकारलेल्या
०२, १०० लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल गृह कर्ज
सोलापूर/१४ : रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण, १९ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार गृहप्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून यातून तीस हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने-आण करण्यासाठी रे नगर फेडरेशन यांनी योग्य नियोजन करावे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रे नगर प्रकल्पाचे संबंधित यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पडेल याची दक्षता घ्यावी, असेही त्यांना सूचित केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. त्याप्रमाणेच प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅड च्या जागेची व तेथील कामाची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सुरक्षा व कायदा व्यवस्थेच्या दृष्टीने माहिती दिली. रे नगर प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनी ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या.
ठेकेदार अंकुर पंदे यांनी रे नगर येथील गृह प्रकल्पाचे सविस्तर माहिती दिली. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर होत असून ३० हजार घरकुले निर्माण केली जात आहेत. एका घरकुलाची किंमत पाच लाख रुपये इतकी असून ३०० चौरस फूट एवढी घरकुलाची जागा असून अडीच लाख रुपये लाभार्थी व अडीच लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च ०१, ८३१ कोटी असून यातील लाभार्थी हिस्सा ७५० कोटीचा असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाची भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ०९ जानेवारी २०१९रोजी झालेले होते तर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले पूर्ण झालेली असून वितरण, १९ जानेवारी रोजी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजरे नगर येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली असून येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा झालेला आहे. या पाणीपुरवठा योजनेची चाचणी पूर्ण झालेली असून आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
२१०० लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करणार
ज्या लाभार्थ्यांचे सिबिल खराब असल्याने बँकेने गृह कर्ज प्रकरणे नामंजूर केली आहेत अशा लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, वीज पुरवठा, सोलार एनर्जी प्रकल्प, अंगणवाडी, शाळा, वाहतूक व्यवस्था या बाबींचा सविस्तर आढावा श्री. पाटील यांनी घेऊन संबंधित यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या.