अक्षता सोहळ्यास पालकमंत्री पाटील यांनी
उपस्थित राहून घेतले श्री सिद्धेश्वर यांचं दर्शन
श्री गुरु श्री सिद्धेश्वरमय्या महाराज की जय....
या जयघोषणांनं दुमदुमला संपूर्ण परिसर
अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले, सर्वश्री माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशशरण पाटील, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त ॲड. मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदि उपस्थित होते. या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते.
'शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय' या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम... दिड्डम... दिड्डमचा उच्चार झाला अन् चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. ' सत्यम् - सत्यम् ' म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या.
![]() |
पालकमंत्री यांच्याकडून श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन
अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिध्देश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यात्रा समितीचे प्रमुख महादप्पा चाकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ही सत्कार करण्यात आला.