Type Here to Get Search Results !

धाब्यावरील धाडसत्र सुरूच; हॉटेल चालकासह चौघांना २८ हजारांचा द्रव्य दंड


सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाब्यावरील धाडसत्र सुरूच आहे. शुक्रवारी मोहोळ येथील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली. न्यायालयाने हॉटेल चालकास २५ हजार रुपये द्रव्य दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली. तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ०१  हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी एकूण २८ हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. 

सविस्तर वृत्त असे की, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे, हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे. याच मोहिमेदरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड (वय- ४३वर्षे) हा त्याच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे (वय- ३३ वर्षे), रामेश्वर नागनाथ राऊत (वय-२८ वर्षे ) व राहुल पारडे (वय - २४) वर्षे या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला. 

चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ, महाळणकर यांचे समक्ष दुपारी हजर केले.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक मयूरा खेत्री, विनायक जगताप, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे , जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली. 

..........आवाहन..........

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाब्यांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून धाब्यांवर बसून मद्यपान करणे किंवा धाब्यांवर दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देणे, हे कायद्याने गुन्हा आहे.  ढाबा मालक व धाब्यावर बसून दारू पिणाऱ्या मद्यपी ग्राहकांवर ३१ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.

ज्या हॉटेल्सना नवीन वर्षाच्या पार्टी निमित्त ग्राहकांना मद्यपींचे वितरण करावयाचे असल्यास त्यांनी या विभागाकडून वन-डे क्लब परवाना मंजूर करून घ्यावा, अन्यथा विनापरवाना मद्याचे वितरण करताना आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी  आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येतील.