Type Here to Get Search Results !

श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधीत कृती आराखड्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करावे : प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे


सोलापूर : श्री सिद्धेश्वर महायात्रा (गड्डा यात्रा) दिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. यात्रा कालावधीत लाखो भाविक श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेऊन होम मैदानावरील मनोरंजन नगरीला भेट देतात. श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधीत कृती आराखड्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करावं, असं प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी म्हटले.

ही यात्रा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे पंच कमिटी व सर्व संबंधित शासकीय विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश सोलापूर क्रमांक ०१ चे उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर सदाशिव पडदुणे यांनी दिले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात गुरूवारी, आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२४ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत श्री. पडदुणे मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक नितीन धार्मिक, अग्निशमन दलाचे ए. ए. धुमाळ, सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, नायब तहसीलदार डी. एफ. गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक राहुल खंदारे यांच्यासह पंच कमिटी व अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.

इन्सिडेंट कमांडर पडदुणे पुढे म्हणाले की, यात्रा कालावधीत तसेच अक्षता सोहळा कार्यक्रमासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने देवस्थान पंचकमिटी आणि यात्रा कमिटीने अक्षता सोहळा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणासाठी देवस्थान ते ज्ञानप्रबोधिनी शाळा दरम्यानचा रस्ता पठाण बाग, रिपीन हॉल आणि होम मैदानामध्ये एलईडी स्क्रीन लावाव्यात. जेणेकरून गर्दी विखुरली जाईल व भाविकांना एलईडी स्क्रीनवर अक्षता सोहळा पाहता येईल. यात्रेमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यास त्यांच्याकरता मंदिर परिसरात आणण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र सुरक्षित मार्ग निश्चित करावा. मंदिर परिसरात पाण्याच्या तलावाचे संरक्षक भिंतीच्या वरील बाजूस बॅरिकेटिंग करून जाळीने अच्छादन करावे. मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या सूचनाप्रमाणे काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मंदिर परिसरातील विद्युत जोडणी विद्युत निरीक्षक यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. तसेच होम मैदानावरील मनोरंजन नगरीमध्ये वीज कंपनीने पुरेशा दाबाचे वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी व  ते योग्य असल्याचे प्रमाणपत्र विद्युत निरीक्षक यांनी द्यावे. कोणत्याही स्टॉल धारकाला अनधिकृत वीज जोडणी देण्यात येऊ नये. मनोरंजन नगरीतील स्टॉलचा नकाशा पीडब्ल्यूडी, महापालिका, पोलीस विभाग यांनी तयार करून त्याचा आराखडा सादर करावा व स्टॉलला रीतसर परवानगी द्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धुळीचे प्रदूषण नियंत्रणात राहील, यासाठी दररोज तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा. धुळीचे प्रदूषण विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशा सूचना श्री. पडदुणे यांनी दिल्या.

श्री सिद्धेश्वर महायात्रा मध्ये अक्षता सोहळा, नंदी ध्वज मिरवणूक, मनोरंजन नगरी या तीन प्रमुख बाबी यात्रेचे आकर्षण असून त्या निमित्ताने सोलापूर शहरात दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक येतात. श्री सिद्धेश्वर यात्रा ही शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन २००५ हा कायदा लागू असून त्या अंतर्गत घटना प्रतिसाद प्रणाली प्रमाणे कृती आराखडा राबविण्यात येत असून त्याचे तंतोतंत पालन सर्व संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक असल्याचे निर्देश पडदुणे यांनी दिले.