(प्रतिमात्मक छायाचित्र)
१६ वर्षात विवाह झालेल्या ३ हजार जोडप्यांना विशेष निमंत्रण
सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने रविवारी,३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात ५२ जोडपी विवाहबध्द होणार आहेत. या साेहळ्याची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती लोकमंगल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी दिली. यंदाचा हा ४० वा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहॆ, असेही आ. देशमुख यांनी सांगितले.
या वर्षीच्या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १६ वर्षात विवाह झालेल्या एकूण ३००० जोडप्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. यंदाच्या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची भव्य प्रतिकृती असणार आहे. शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर २५०x२०० फूट बंदी आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार आहॆ.
विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना रूखवत (संसारोपयोगी भांडी), मणी मंगळसूत्र आणि आवश्यक कपडे फाऊंडेशनतर्फ देण्यात येणार आहे. विवाहापूर्वी वधू-वरांचा मेकअप, याशिवाय अक्षता सोहळ्यापूर्वी यंदा प्रथमच उघड्या रथातून वधू-वरांची वरात काढली जाणार आहे. नवविवाहित जोडप्यांना संसार सुखी संसाराबाबत मार्गदर्शन व समुपदेशन कार्यकमही विवाहसाेहळ्यादिवशी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. वैवाहिक सहजीवनाची ५० व अधिक वर्षे पूर्ण केलेली जोडपी मार्गदर्शन करणार आहेत. या जोडप्यांचाही पूर्ण आहेर देऊन सन्मान केला जाणार आहे.
या विवाह समारंभात सर्व वधू-वरांच्या वऱ्हाडींना भोजनाची सोय करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर २५०x२०० फूट बंदी आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार आहे. जेवणाची व्यवस्था ९०×१५० फूट आकाराच्या मंडपात करण्यात येणार आहे. याचसोबत यावेळी सादर होणाऱ्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी २०× ३० फूट ची दोन व्यासपीठे उभारली जातील. मुख्य व्यासपीठा १५x५० फूट आकाराचे असणार आहे.
विवाह समारंभाच्या मंडपाला जोडून उभ्या करण्यात आलेल्या दालनात लोकमंगल समुहाच्या आजवरच्या कार्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शिवाय दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. सर्व सोलापूरकरांना या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला फाऊंडेशनचे संचालक, शशी थोरात, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, मारुती तोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
.....चौकट......
यंदा मान्यवरांच्या हस्ते होणार कन्यादान
दरवेळी प्रमाणे कन्यादान आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंदा एका जोडप्याचे कन्यादान आ. देशमुख करणार असून उर्वरित वधूंचे कन्यादान करण्याचा मान मान्यवरांनाही देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षापासून लोकमंगलने हा नवीन उपक्रम राबवला आहे.