
ओरिसातील ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. अभिजीत वाघचवरे यांचे यश
सोलापूर : ओडिशामधील पुरी येथे शनिवारी पार पडलेल्या भारतातील अत्यंत अवघड व एकमेव फुल आयर्न मॅन डिस्टन्स हर्क्युलियन ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ.अभिजीत वाघचवरे यांनी यश मिळविले. त्यांनी ही स्पर्धा १६ तास २५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. हर्क्युलियन ट्रायथलॉन, पुरी येथील या स्पर्धेचे तिसरे पर्व होते. सकाळी साडेसहा वाजता बंगालच्या उपसागरात चार किलोमीटर पोहण्याने स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी देश-विदेशातून शेकडो स्पर्धक आले होते.
पेशाने अस्थिरोग तज्ञ असलेले डॉ. अभिजीत वाघचवरे सोलापूरातून हे एकमेव स्पर्धक होते, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केले. सोलापुरातून फुल आयर्न मॅन डिस्टन्स स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिलेच व्यक्ती बनले आहे. अत्यंत कठीण अशी शारीरिक व मानसिक क्षमता या दोन्हीची कसोटी लागणारी ही स्पर्धा होती. ही स्पर्धा पूर्ण करण्याकरिता त्यांना १७ तासांचा कट ऑफ टाईम होता. म्हणजे ठरलेल्या वेळेत जर स्पर्धा पूर्ण केली तरच तुम्हाला स्पर्धा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व मेडल दिले जाते.
फुल आयर्न मॅन डिस्टन्स म्हणजे ०४ किलोमीटर समुद्रामध्ये पोहणे त्यानंतर १८० किलोमीटर सायकलिंग करणे व त्यानंतर लगेच ४२.२ किलोमीटरचे रनिंग असे एकूण तीन क्रीडा प्रकार एकत्र केले जातात. पुरी मधील हर्क्युलियन ट्रायथलॉन स्पर्धेतील पोहणे हे उसळत्या लाटांच्या बंगालच्या उपसागरात, सायकलिंग पुरीच्या रोड वरती आणि रनिंग हे पूरीच्या गोल्डन समुद्र किनाऱ्याच्या बाजूने होते.
सायकलिंग व रनिंग च्या वेळेस वेगाने उलटे वाहणारे वारे हे खूपच आव्हानात्मक होते. ओरिसातील या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रुट सपोर्ट, हायड्रेशनसाठी त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री या पूर्ण वेळ ( १७ तास ) रूट वरती होत्या.
देशात आणि विदेशात आयर्न मॅन खिताब पटकविलेल्या त्यांच्या बहिण. डॉ स्मिता झांजुर्णे व त्यांचे पती डॉ.राहुल झांजुर्णे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन डॉ.अभिजीत यांना या स्पर्धेच्या तयारीसाठी लाभले.
डॉ.अभिजीत यांनी पूर्वी देखील अवघड अशी जगप्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेतील १२ तासांची ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन देखील पूर्ण केली आहे. तसेच गोवा हाफ आयर्न मॅन, कोल्हापूर ची हाफ डिस्टन्स र्ट्रायथलाॅन व चंदिगड येथील टफमॅन, अरबी समुद्रातील ०५ कि.मी. ची स्विमॅथाॅन त्यांनी पूर्ण केली आहे.
या सर्व स्पर्धेमधून त्यांना सराव व अनुभव मिळत गेला व आज त्यांनी अत्यंत कठीण अशी समजली जाणारी हर्क्युलियन ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली. स्वतःचे हॉस्पिटल, रोजचे ऑपरेशन्स करीत स्वतःसाठी त्यांनी रोज सकाळचा वेळ राखून ठेवला होता.
व्यायामाने आरोग्य कसे चांगले ठेवावे, आरोग्य हीच धनसंपदा याचे एक चांगले उदाहरण आजच्या तरुणाई पुढे डॉ. अभिजीत यांच्या रूपात आपल्याला दिसते.आपण कितीही कामांमध्ये व्यस्त असलो तरी व्यायामासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वांना व्यायामाचे महत्त्व पटवून देत चांगले आरोग्य कसे राखावे, यासाठी संस्था, शाळा ,कॉलेज व इतर ठिकाणी ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात.
त्यांच्या या यशामध्ये त्यांचे आई ,वडील, बंधू डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. राजश्री वाघचवरे आणि डाॅ. शुभांगी वाघचवरे, डब्ल्यू प्लस स्पोर्ट्स आणि ईको चे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.