एक टक्क्यासाठी काम करणाऱ्या सराफाची ०२.९० लाखाची फसवणूक
सोलापूर : सोने तारणात मध्यस्थ म्हणून १ टक्का कमिशन मिळवण्याचं काम करणाऱ्या सराफाची, मीच हर्षल आहे, माझेच सोने सोडविण्यासाठी फोन केला होता. सदरची रक्कम माझ्याकडे द्या, असे सांगून अज्ञाताने त्या सराफाची ०२.९० लाख रुपयांची फसवणूक केलीय. ही घटना शुक्रवारी, ०१ डिसेंबर रोजी दुपारी मुथुट फायनान्स ऑफिस खाली, शितल हॉटेल शेजारी घडलीय. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी भ्रमणध्वनी, ७०५८३३२१९२ च्या धारकाविरुध्द गुन्हा दाखल केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भवानी पेठ, मड्डी वस्तीतील सराफा दुकानदार उदय शरदराव कुलथे (वय- ३९ वर्षे) यांचं मधला मारूती सराफा बाजारात सोन्या-चांदीचं दुकान आहे. त्यांची मुथुट फायनान्समधील मॅनेजर गुरुदत्त वाघमारे यांचेशी ओळख आहे. मॅनेजर यांनी जर कोणी ग्राहक सोने इतरत्र गहाण ठेवण्यासाठी आले किंवा त्यांनी इतरत्र सोनारांकडे सोने गहाण ठेवले असेल तर त्यांना फायनान्समध्ये कमी व्याजदराने कर्ज देऊ, त्यासाठी तुम्ही मदत करा, असे सांगितले होते.
त्यासाठी त्यांना फायनान्समधून रक्कम मिळेपर्यंत रक्कमेची व्यवस्था करीत जावा, त्यापोटी उदय कुलथे यांना ग्राहकाकडून ०१ टक्का कमीशन मिळत असे. शुक्रवारी दुपारी, मुथुट फायनान्सचे मॅनेजर गुरुदत्त वाघमारे यांनी फोन करुन सांगितले की, एका ग्राहकाचे सोने रेवणकर सराफांकडे तारण ठेवले असून ते सोडविण्यासाठी ०२.९० लाख रुपये लागणार आहेत, त्याची तरतुद करुन ग्राहकास द्या, ग्राहकास तुमचा मोबाईल नंबर दिला असून ते तुम्हाला कॉल करतील, असे सांगितले होते.
त्यानंतर थोड्याच वेळात, उदय कुलथे यांना ७०५८३३२१९२ या नंबरवरुन कॉल आला. त्या व्यक्तिनं मी हर्षल बोलतो आहे, मला फायनान्समथील साहेबांनी तुमचा नंबर दिला आहे, माझे सोने सोडविण्यासाठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ०२.९० लाख रुपये रोख स्वरुपात द्या, मी फायनान्स ऑफिसच्या खाली थांबलेलो आहे, असं म्हटले. उदय कुलथे व सोबत सौरभ जोजारे असे मुथुट फायनान्स ऑफिसच्याखाली आले व तेथून त्या क्रमांकावर कॉल केला असता, ३० ते ३५ वयोगटातील एक जण फोनवर बोलत कुलथे यांच्याकडे आला.
कुलथे यांनी ती रक्कम त्याच्या ताब्यात दिली. त्याने सदरची रक्कम नेऊ, तुम्ही तुमची गाडी घ्या, आपण सराफाकडे जाऊ, असे म्हटल्याने फिर्यादी बाजूला लावलेली गाडी वळवून घेईपर्यंत तो इसम हा तेथून निघून गेला. त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता, तो बंद लागत होता. त्याची आजपावेतोपर्यंत वाट पाहिली असता, परत न आल्याने व त्याचा मोबाईल देखील बंद लागत असल्याने त्या अज्ञातानं ०२.९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस निरीक्षक देशमुख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.