सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के नोकर भरती वेळेत करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी, १८ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद कामगार युनियनच्या वतीने बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्य शासनाने ७५ हजार नोकर भरती करण्याची घोषित केले. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील(वाहन चालक व ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता मिळाली आहे.
त्यानुसार सन २०२३ मध्ये होणारी पदभरतीच्या अनुषंगाने एकूण रिक्त पदांच्या संवर्गनिहाय कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कनिष्ठ/वरिष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक इत्यादी ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के रिक्त पदे वेळेत भरण्याची कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेले आहेत.
त्याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाने १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पदभरती करणेबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, त्याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी १० टक्के नोकरभरती केली आहे, परंतु सोलापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के पद भरती करण्यास जाणीवपूर्वक विलंब व टाळाटाळ केली जात असल्याचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद कामगार युनियन च्या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.