Type Here to Get Search Results !

प्रियकरानं दिली जगणं मुश्किल करण्याची धमकी अन् संस्थापकाचा शाळेत येण्यास मज्जाव; विद्यार्थिनीची आत्महत्या



प्रियकरानं दिली जगणं मुश्किल करण्याची धमकी अन् संस्थापकाचा शाळेत येण्यास मज्जाव; विद्यार्थिनीची आत्महत्या

सोलापूर : प्रियकरानं दिलेलं लग्नाचं वचन मोडत, बदनामी करून तुझं जगणं मुश्किल करतो, अशी धमकी दिल्याने तरूणीनं स्वतःचं जीवन संपवलं, ही घटना होटगी रस्त्यावरील शिवशाही शंकर नगरात, शुक्रवारी, १५ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी त्या प्रियकरासह ४ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीतांमध्ये एका शिक्षण संस्थेच्या संस्थापकाचा समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजलीय. हा प्रकार शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकाराची लक्तरं वेशीवर टांगणारा असल्याचे मानले जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, होटगी रस्त्यावरील शिवशाही शंकर नगरातील रहिवासी, १९ वर्षीय स्मिता (नावात बदल) हिच्याशी दर्शन आगरखेड नावाच्या तरुणाची प्रेमसंबंध होते. त्याने तिला 'मी तुझ्याशी लग्न करणार नाही, अन् तुझी समाजात बदनामी करून तुला जगूही देणार नाही ' अशी धमकी दिली होती. ही बाब तिने तिच्या आईच्या कानी घातली. त्यातच ती शिकत असलेल्या शाळेचे मल्लिकार्जुन प्रशाला, हत्तुरे वस्ती या शाळेचे संस्थापक धऱ्याप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी आणि आगरखेड सर यांनी, तुला शाळेतुन काढून टाकतो व तुझी बदनामी करतो, अशी धमकी देऊन तिला शाळेत येण्यास मज्जाव केला होता.

प्रियकर दर्शन आगरखेड यांने लग्नास नकार दिल्यामुळे फिर्यादीची मुलगी स्मिता हिने शुक्रवारी, दुपारी घरातील खोलीमध्ये जाऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी, तिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिचे मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दर्शन आगरखेड, दर्शनचे वडील, संस्थापक धऱ्याप्पा हत्तुरे आणि सुधाकर कामशेट्टी अशी आरोपींची नांवे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.