जबाबदारी समजून सर्वांनी दिव्यांगांना साहाय्य करावे: कुलगुरू डॉ. महानवर
सोलापूर विद्यापीठात दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
सोलापूर : दिव्यांगांसाठी सरकार चांगले काम करत आहे. दिव्यांग व्यक्ती सामान्यांपेक्षा विशेष कार्य करण्यासाठी नेहमी धडपडत असते. त्यांच्यात वेगळी ऊर्जा असते. अशा सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्वांनी आपली जबाबदारी समजून नेहमी साहाय्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, व्याख्याते नूतन महाविद्यालय सेलू, परभणी येथील मराठी विभागप्रमुख डॉ. राजाराम झोडगे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. काळवणे यांनी केले.
कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, दिव्यांगांविषयी सर्वांच्या मनात सहानुभूती असणे आवश्यक आहे. त्यांना कधीही कमी लेखू नये. त्यांच्यासाठी सोलापूर विद्यापीठात जे काही करता येईल, ते सर्व करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. दिव्यांग व्यक्ती अडचणीवर मात करीत यशस्वी होत असतात. त्यामुळे सर्वांनी त्यांना मदत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
व्याख्याते डॉ. झोडगे म्हणाले की, दिव्यांगांसाठी आज अनेक कायदा व शासनाच्या योजना आहेत. त्याचा लाभ दिव्यांगांना होणे आवश्यक आहे. मात्र काही वेळा बोगस प्रमाणपत्राद्वारे सामान्य माणूस देखील शासनाला फसवून दिव्यांग योजनाचा लाभ घेत आहेत, ही बाब अत्यंत प्रियक आहे. दिव्यांग व्यक्तींचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना मदत करणे आवश्यक आहे. शासनाच्या कार्यालयात दिव्यांगांसाठी ज्या सुविधा देणे आवश्यक आहे, त्या तत्पर मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. याचबरोबर त्यांनी यावेळी दिव्यांगाच्या समस्या आणि त्यांचे हक्क व योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
कुलसचिव घारे म्हणाल्या, दिव्यांगांना मदत करणे हे सर्वसामान्य प्रत्येकांचे कर्तव्य आहे. माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येकाच्या मनात दिव्यांगांविषयी संवेदना असणे आवश्यक आहे. दररोजच्या जीवनात ज्या ठिकाणी शक्य होईल, त्या ठिकाणी दिव्यांगांना सर्वांनी मदत करावे. याचबरोबर वंचित दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर डॉ. राजेंद्र वडजे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी:
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, व्याख्याते डॉ. राजाराम झोडगे, डॉ. केदारनाथ काळवणे आणि डॉ. राजेंद्र वडजे छायाचित्रात दिसत आहेत.