खळबळजनक... !
निरीक्षणगृहातील ०५ मुलांचं अपहरण
सोलापूर : प्रशासन व्यवस्थेला हादरवून सोडणारी घटना सोलापुरात घडलीय. शाळेच्या निमित्ताने निरीक्षण गृहाबाहेर गेलेल्या ०५ मुलांना अज्ञातानं कशाचं तरी आमिष दाखवून त्यांचा अपहरण केलं असल्याची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटेपूर्वी दाखल करण्यात आलीय. बाल निरीक्षणगृहातून मुलं पळूनही जातात. ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी बालगृहातील ०५ मुले एकाच वेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी बालगृहातील मुले सोलापूर महानगरपालिका कॅम्प शाळा क्रमांक एक मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेली होती. त्यांना अज्ञातानं कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून निरीक्षण गृह/बालगृहाचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेलं असल्याची फिर्याद सुरक्षा रक्षक विजयकुमार मधुकर शिंदे (रा. ३७१, जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी आज पहाटे सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली.
कार्तिक सयाजी पाटील (वय-१६ वर्षे), तुषार महेश पुर्ण नाव नाही (वय-१६ वर्षे), अजय शरणप्पा झुरळे (वय-१५ वर्षे), अर्जुन पुर्ण नाव नाही (वय-१३ वर्षे) आणि ऋतिक चंद्रकांत चौगुले (वय-१२ वर्षे, सर्व रा. निरीक्षण गृह/बालगृह, ९३७/१ उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी त्या मुलांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.