पाचशेहून अधिक लोकसंख्येच्या वाड्या-वस्त्यांना द्यावा
स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा : विश्वशांती संघटनेची मागणी
दक्षिण सोलापूर/संजय पवार :
पाचशेहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या वाड्या-वस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा, अशा मागणीचं निवेदन विश्वशांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव, मुळेगाव तांडा, वडजी, वरळेगांव, रामपूर, बोरामणी, दर्गनहळ्ळी, व इतर गावांमधील पाचशे पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या तांडा तसेच बेघर वस्ती, मागास वस्ती व इतर अनुसूचित जाती-जमाती या वस्तीतील नागरिकांच्या नागरी समस्या कायमच्या सुटाव्यात, यासाठी शासनाच्या विविध योजनामधून या लोकांचं पुनर्जीवन व विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.
या दृष्टीने या भागातील या छोट्या-मोठ्या बेघर वस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळणे नितांत गरजेचे आहे. अशा वाड्या-वस्त्यांना शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, याकरिता शासन स्तरावर निर्णय घ्यावा, असंही विश्वशांती सेना सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी विश्वशांती सेनेचे मार्गदर्शक तथा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.