संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचा शानदार प्रारंभ
सोलापूर : हैद्राबाद रस्त्यावरील विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरच्या भव्य प्रांगणात क्रीडा सप्ताहाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी, १६ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व संस्था सदस्या डॉ. सौ. राधिका चिलका उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली, पर्यवेक्षक सतीश मल्लाव, ज्युनिअर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ व्हटकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्य गीत गायनाने झाली. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वती माता व संस्थेचे आधारस्तंभ स्व. विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन आणि क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले.
'अतिथी देवो भव' या उक्तीप्रमाणे पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्या डॉ. सौ. राधिका चिलका यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. सौ. राधिका चिलका यांचा सत्कार मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सर्व खेळाडूंनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना व्यायाम, खेळाचे महत्व, त्यांचे फायदे, खेळाचा मार्क वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो, तसेच खेळामुळे नोकरीला कसे आरक्षण मिळते, या बद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या प्रशालेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून या क्रीडा सप्ताहाचं प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय नरुटे यांनी केले तर सौ. गीता गोटीपामुल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.