Type Here to Get Search Results !

निराधार मुलांना आधार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे कौतुकास्पद : आडम मास्तर



भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार आणि अनाथ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न

कासेगांव/संजय पवार : 

आजमितीला विविध कारणांमुळे समाजात निराधार मुलांचे प्रमाण वाढते आहे. आई-वडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अशी जी निराधार मुले आहेत, त्यांना आधार देणे अतिशय गरजेचे आहे, असे सांगत बाबासाहेबांचा समाजवाद रुजवण्यासाठी लढत आहे.मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार मुलांना आधार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी काढले.

नामदेवराव भालशंकर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. 

यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, मुंबई येथील जीएसटी अधिकारी अमोल वरखेडे, पोलीस निरीक्षक रईसा शेख, माजी पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, रुक्मिणी भालशंकर, जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष शहा, नानासाहेब भालशंकर, लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

त्यानंतर रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू, दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. त्‍यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना भरघोस अशी रोख पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.


अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, अनाथ मुलांना आपुलकी, माया, ममता, प्रेम देणे गरजेचे आहे. आपण आपल्या घरी आल्यानंतर अधिक उत्साही, आनंदी राहतो. याचे कारण म्हणजे या ठिकाणी माया, ममता, प्रेम, उत्साह, वत्सलता, आपुलकी अशा विविध भावभावना असतात, हीच आपुलकीची भावना अनाथ मुलांना देणे आवश्यक आहे. अशा अनाथ मुलांना आधार देण्यासाठी मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन ची निर्मिती केली आहे,असे विचार व्यक्त केले.

सत्कार मूर्तींच्यावतीने प्राचार्य जयसिंगराव गायकवाड आणि कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे, पार्थ पोळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुंबई येथील जीएसटी अधिकारी अमोल वरखेडे याचेही मनोगत झाले. या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्रा. युवराज भोसले यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.

हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल जानराव, मिलिंद भालशंकर, प्रकाश साळवे, शिवाजी जगताप, दत्तात्रय शिंदे, दाऊत आतार, अभिजीत भंडारे, विष्णू लादे, कैलास माने, सत्यवान पाचकुडवे, शिवानंद चौगुले, आदींनी परिश्रम घेतले.

.................... चौकट ..............

... यांचा झाला सन्मान-

 भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार 

माढा येथील शिवलाल रामचंद्र वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राणिमित्र विलास शहा,

राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार 

कोल्हापूरचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अभयकुमार साळुंखे, 

महात्मा जोतिराव फुले जीवन गौरव पुरस्कार 

पुणे येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र मागाडे,

छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 

विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर ढेपे,

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कार 

साहित्यिक पार्थ पोळके,

छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार

कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे,

माता रमाई भिमराव आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 

भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य उपाध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे, 

राष्ट्रसंत गाडगेबाबा गुणवंत कर्मचारी पुरस्कार 

मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव ता. माढा या प्रशालेतील सेवक माधव माने 

आणि 

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 

लालबहादूर शास्त्री प्रशाला, सोलापूर येथील सहशिक्षिका वासंती पाटील 

या नऊ जणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले.