महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा प्रवास; २८ फेब्रुवारीला मुंबईत समारोप
सोलापूर : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचे पाईक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची निर्मिती केलीय. ही भक्ती शक्ती संवाद यात्रा राज्याच्या ३६ जिल्ह्यात ७२ दिवसाचा प्रवास करून मुंबईत त्याचा समारोप होणार असल्याची माहिती भक्ती शक्ती संवाद यात्रेचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रमुख अक्षयमहाराज भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्र भर... ! या भावनेने भक्ती शक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ पंढरपुरात श्री विठ्ठलाचा दर्शन घेऊन सोमवारी, २५ डिसेंबर रोजी झाला. या संवाद यात्रेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सोलापूर शहरातील प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली. अशा स्थळाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालेले असले तरी त्यांच्या समस्या सोडवून त्या-त्या स्थळांचे महत्व आणि महात्म्य कायम राहावं यासाठी आमच्यापर्यंत संतांनी येण्याऐवजी आम्हीच त्यांच्यापर्यंत या यात्रेच्या माध्यमातून जात आहोत, असे अक्षयमहाराज भोसले यांनी प्रारंभी
सांगितले.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेद्वारा भक्ती शक्ती संवाद यात्रा म्हणजे विशेषत्वाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजीमहाराज व संत परंपरेचा विचार एकत्रितरित्या समाजापर्यंत घेऊन जात महाराष्ट्र हितासाठी कार्यरत असणारे शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मासमवेत महापुरुषांच्या विचारांच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा आलेख सर्वांपर्यंत पोहोचवणे हाही या संवाद यात्रेचा मुख्य हेतू असल्याचे अक्षयमहाराज भोसले यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्र व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, गावोगावी असणारे भजन मंडळ या सोबत शक्तीचा अर्थात हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिव-शंभो विचारांना समाजापर्यंत नेणाऱ्या तमाम युवक, गोरक्षक व ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने भक्ती शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यात विभागवार प्रवास करणार आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाने यात्रा प्रवास होणार आहे. प्रत्येक दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. यावेळी यात्रेत विविध पंथांचे प्रचारक व संत वंशज देखील असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व कोकण अशा पाच टप्प्यात २८, फेब्रुवारी २०२४ असा संवाद यात्रेचा कालावधी असून सकाळी ०६ ते रात्री ०९ असा १५ तास सक्रिय असणारा हा प्रवास आहे, या दरम्यान पूर्ण वेळ निवास देखील धार्मिक ठिकाणे वा आश्रमामध्ये असणार आहे.
भक्ती शक्ती संवाद यात्रेदरम्यान सोमवारी श्री विठ्ठल रखुमाई दर्शन घेतले. तिथल्या सर्व मठप्रमुखांच्या आणि भाविकांना येणाऱ्या समस्या समजून घेतल्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविल्यानंतर कार्यतत्पर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे ३१ डिसेंबर रोजी बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे कळविले असल्याचेही भक्ती शक्ती संवाद यात्रेचे प्रमुख अक्षयमहाराज भोसले यांनी शेवटी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत शिवभद्र स्वामी महाराज यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
...... चौकट .......
...असा असणार आहे, भक्ती शक्ती संवाद यात्रेतील
पहिल्या टप्प्यातील नियोजित प्रवास !
पश्चिम महाराष्ट्रात...
सोलापूर - २५, २६ डिसेंबर,
धाराशिव - २७, २८ डिसेंबर,
सांगली - २९, ३० डिसेंबर,
कोल्हापूर - ३१, डिसेंबर, ०१ जानेवारी २४,
सातारा - ०२, ०३ जानेवारी,
पुणे -०४, ०५ जानेवारी,
उत्तर महाराष्ट्रात...
नाशिक - ०७, ०८ जानेवारी,
धुळे -०९, १० जानेवारी,
जळगाव - ११, १२ जानेवारी,
आणि
नंदुरबार - १३, १४जानेवारी,
असा प्रवास आहे.