अमरावती : "काव्य म्हणजे समाजमनाचा आरसा आहे,काव्याला कोणतीही जात,पंथ ,धर्म नसतो. माणुसकी हाच खरा धर्म. मनातील वेदनेचा आविष्कार काव्यातून होतो. काव्यलेखनात वैचारिक समृद्धता, प्रगल्भता आणणे गरजेचे आहे." असे गौरवोद्गार अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक बबन सराडकर यांनी काढले.
निमित्त होते... ! काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी पदव्युत्तर विभाग, अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १४व्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवाचे. २३ डिसेंबर व २४ डिसेंबर २०२३ रोजी अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ.के.जी.देशमुख सभागृहात दोन दिवसाचे राज्यस्तरीय काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ मोनाताई चिमोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी संत गाडगेबाबा यांचे वंशज प्रविण जानोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्या म्हणाल्या, "काव्यलेखन करताना जुन्या परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे नव बदलांचाही स्वीकार केला पाहिजे. साहित्याचा वारसा जपण्यासाठी तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नवोदितांना तसेच महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी त्यांच्यात अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे." असे सांगतानाच त्यांनी काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे साहित्यविषयक कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
![]() |
यावेळी आनंद घोडके यांच्या 'अशी ही दुनियादारी' या महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय "वैदर्भी काव्यप्रभा प्रातिनिधिक कविता संग्रह, संजयराव देशमुख- चरे अंतरीचे, स्वाती वानखडे- भावनांची शब्दफुले, कविता काठाने- कल्पना के रंग, कल्पना लांडे- कल्पनेचा गुंता, गायत्री पुनकर- मी आहे ना!, अंजली वारकरी- मधूगंध, सीमा भांदर्गे- धरा वाचवा व किशोर जऱ्हाड- पेरण" इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्हिडिओ तसेच इतर काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना कराळे, अंजली वारकरी यांनी तर प्रास्ताविक दीपक सपकाळ यांनी आणि आभारप्रदर्शन वर्षा भांदर्गे यांनी केले.
२३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरू झालेल्या काव्यमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला परिसंवाद, गझलसंध्या, गझल रजनी, काव्यरजनी तर २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत ग्रंथपूजन, काव्यप्रभात, काव्यसमीरा, काव्यवर्हाडी, काव्यमंजिरी, काव्यगुंजन, काव्यमंजुषा, गझलकौमुदी, काव्यप्रतिभा, काव्यवर्षा, काव्यानंद, काव्यसंध्या, काव्ययामिनी इत्यादी सत्र झाले.
या सत्रांचे सूत्रसंचालन कुमूद कोरडे, महेश राजूरकर, शैला चेडे, शुभांगी निंबोळे, मंजू वणवे, छाया शहाणे, तेजस्विनी लोखंडे, अर्चना गुल्हाने, वंदना विंचूरकर, सीमा भांदर्गे, शीतल अथाटे, विशाल कण्हेरकर, रंजना कराळे, प्रमोद भागवत, अजय अडीकने इत्यादींनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा भांदर्गे, मनोज भांदर्गे, खुशाल गुल्हाने, विजय बिंदोड, राजेश चौरपगार, गणेश खडके, आबासाहेब कडू, प्रमोद भागवत, श्याम चौकडे, विशाल मोहोड, विशाल कन्हेरकर इत्यादींसह अमरावती काव्यप्रेमी मंचने परिश्रम घेतले.