उत्तर सोलापूर प्रीमियर लीग चे उद्घाटन
उत्तर सोलापूर : स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपल्या कामगिरीवर पुढे जात आहेत, त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उत्तर सोलापूर तहसीलदार सैपन नदाफ यांनी केले.
पृथ्वीराज माने युवा मंच तालुकाध्यक्ष सुनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गुळवंची येथे उत्तर सोलापूर प्रीमियर लीग चे आयोजन केले जाते. स्पर्धेचे उद्घाटन सैपन नदाफ यांच्या शुभहस्ते गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी करण्यात आले. यावेळी अजय सोनटक्के, सुनिल जाधव, संजय पौळ, सुनिल भोसले, तात्या कदम, पांडुरंग नवगिरे, तानाजी भोसले उपस्थित होते.
उत्तर सोलापूर प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, मी देखील एक क्रिकेट प्रेमी म्हणून या कार्यक्रमास आलेलो आहे. अशा स्पर्धेतूनच नवनवीन खेळाडू हे पुढे येत असतात. सोलापूरच्या आर्शिन कुलकर्णी याची लखनऊ संघात वर्णी लागली आहे. स्पर्धेत खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा, असे आवाहनही तहसीलदार नदाफ यांनी यावेळी केले.
स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून २५ डिसेंबरपर्यंत क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसमोर भिडणार आहेत. उत्तर सोलापूर प्रीमियर लीग चे यंदाचे सहावे वर्ष आहे. २५ तारखेला बक्षीस वितरण होणार आहे. प्रथम पारितोषिक रुपये ४१,०४७ व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक २१,०४७ रुपये व ट्रॉफी, तृतीय बक्षीस ११,०४७ रुपये तर चौथे बक्षीस १०,०४७ रुपये व ट्रॉफी.याशिवाय सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी काशिनाथ दळवी, उपसरपंच श्रीकांत शिंदे, मेनोद्दीन पठाण, उमेश इंगळे, ईश्वर दिवाण, शहाजी नवगिरे, सतीश जगताप, गणेश शिंदे, प्रशांत पौळ, सचिन कांबळे यांचे सहकार्य लाभले आहे.