सोलापूर : आयुष्यमान भारत योजना अंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणे बरोबरच सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी अतिशय गतिमान पद्धतीने प्रक्रिया राबवावी. या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वास आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत/ महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा बाबत डॉ. शेटे यांनी आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी, डॉ. दिलीप वाघमारे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर सोळुंके यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे प्रमुख व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ५१ रुग्णालये पॅनलवर असून जिल्ह्यातील ११ तालुक्यापैकी मोहोळ व अक्कलकोट तालुक्यात एकही रुग्णालय पॅनलवर नाही. आरोग्य यंत्रणेने या दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील पॅनेल वरील रुग्णालयांची संख्या वाढवण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावेत. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान पॅनल वरील रुग्णालयांची संख्या दोन असली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश डॉक्टर शेटे यांनी दिले.
शासकीय योजनेअंतर्गत उपचार केल्यानंतर शासनाकडून खाजगी रुग्णालयाना पॅकेज दिले जाते ते कमी असल्याने उपचार करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. तरी पॅकेजमध्ये वाढ करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येणार असून पॅकेजच्या रकमेत वाढ प्रस्तावित असल्याने खाजगी रुग्णालयांनी पॅनलवर येण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत व गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाख ६१ हजार १७२ इतकी असून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एकूण लाभार्थी २३ लाख ४७हजार ५५५ इतके आहेत तर आज रोजी पर्यंत ०६, ६८, ३५९ लाभार्थ्यांना गोड कार्ड गोल्डन कार्ड देण्यात आलेले आहे तर १६ लाख ७९ हजार लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड पुढील काही दिवसात काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने तसेच जिल्हा प्रशासनाने शिबिरांचे आयोजन करावे. त्याप्रमाणेच अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर येथे येणाऱ्या भाविकांची नोंदणी करण्यासाठी दर्शन रांगेच्या सुरुवातीला नोंदणी काउंटर सुरू करण्याची सूचना ही डॉ. शेटे यांनी केली. सोलापूर महापालिका गोल्डन कार्डच्या नोंदणीत खूपच पाठीमागे असून महापालिकेने गोल्डन कार्ड ची संख्या वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले पाहिजे. अंगणवाडी, शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नियमित झाली पाहिजे. ज्या बालकांना गंभीर आजार असतील व त्यांच्यावर शस्त्रक्रिया ची आवश्यकता असेल अशा बालकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या कार्यक्रमांतर्गत आरोग्य साहित्य तसेच अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध असल्याची माहिती डॉ. शेटे यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी महा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
प्रारंभी आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर जोशी व डॉक्टर वाघमारे यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाच दिवसात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५० हजार लाभार्थ्यांची नोंदणी करून अत्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
......... ठळक .......
शासन निर्णय २८ जुलै २०२३ नुसार आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रित करण्यात आली, या अंतर्गत पाच लाखापर्यंतचे आरोग्य उपचार मोफत करण्यात येणार.
जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोल्डन कार्डचे लाभार्थी संख्या २३ लाख ४७ हजार ५५५, तर प्रत्यक्ष गोल्डन कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांची संख्या ६ लाख ६८ हजार ३५५.
सोलापूर जिल्हा परिषदेने एकाच दिवसात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५० हजार लाभार्थ्यांची नोंदणी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला.
या योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी संख्या वाढवण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने, अक्कलकोट, पंढरपूर व सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेच्या सुरुवातीला नाव नोंदणी साठी डेस्क उभारणार.