१५ हजार रुपयांची लाच स्विकारली; जिल्हा व्यवस्थापकासह दोघे गजाआड
सोलापूर : मुकबधीर अर्जदारास कुक्कुटपालन व्यवसायाकरीता मंजूर झालेले कर्ज तिच्या खात्यावर जमा करण्यासाठी २० हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती १५ हजार रुपये कंत्राटी कर्मचाऱ्याकरवी स्वीकारल्याप्रकरणी महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आलं. महेंद्र मल्लिशा माने (वय- ५४ वर्षे) असं त्यांचं नाव आहे. याप्रकरणी उभयतांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसीबी कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महात्माफुले मागासवर्ग विकास महामंडळ, पुणे कार्यालयाचे महेंद्र मल्लिशा माने यांच्याकडे सोलापूर जिल्हा व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या आर्थिक महामंडळाकडून एका मूकबधिर अर्जदारास कुकुट पालन व्यवसायाकरिता ०५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. त्या कर्ज प्रकरणाची मंजूर रक्कम तिच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक महेंद्र माने यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. शेवटी तळजोडीअंती १५ हजार रूपये देण्या-घेण्याचे निश्चित झाले.
या प्रकरणी त्या अर्जदाराचा भावाने तक्रार दाखल केली, त्यानुसार१५ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर२०२३ पडताळणी झाल्यावर शुक्रवारी,०८ डिसेंबर रोजी सापळा रचून कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी महेश बनसोडे यांच्यामार्फत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, पुणे अतिरिक्त कार्यभार सोलापूर जिल्हा व्यवस्थापक (वर्ग-२) महेंद्र मल्लिशा माने (रा.१०८ मिलींद नगर, बुधवार पेठ, सोलापूर) आणि कंत्राटी कर्मचारी महेश श्रीमंत बनसोडे (वय-२८ वर्षे, रा. अरळी ता. अक्कलकोट) यांना ताब्यात घेऊन उभयतांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार- सपोफौ/चडचणकर, कोळी, पोह/शिरीषकुमार सोनवणे, पोना/स्वामीराव जाधव, पोना/घाडगे, पोना घुगे, पोशि/पवार, चालक पोशि/शाम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
नागरीकांना आवाहन
एसीबी तर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर अथवा पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर. संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in
ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov. in
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक - १०६४
दूरध्वनी क्रमांक - ०२१७-२३१२६६८
व्हॉटस अॅप क्रमांक - ९९३०९९७७०० असं आवाहन एसीबी सोलापूरच्या वतीनं करण्यात आलं आहे.