मनपा प्रशासनाचा नोंदविला निषेध; मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सोलापूर : अवघ्या ०३ महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या महिलेला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला. ही येथील लोकसेवा हायस्कूलजवळ घडलीय. त्या महिलेनं कसा-बसा आपला जीव वाचवून त्या कुत्र्यापासून स्वतःचा बचाव केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत एनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले, त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच दंशाला कारणीभूत ठरलेला कुत्रा मरण पावला. त्या कुत्र्याचा मृतदेह मनपा प्रवेशद्वारावर ठेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर ही नागरी समस्या बनलीय. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन त्यावर उपाययोजना करण्याचा आग्रह धरून होते. याकडे सोलापूर महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप आहे.
लोकसेवा हायस्कूलजवळील घटनेत, राहत ने दिलेल्या इंजेक्शननंतर तो कुत्रा मेल्यावर, प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी अन् पोलिसांत झटापटी झाली. यावेळी महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक काढून सदरचा तोडगा काढून शहरातील अन्य मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.