Type Here to Get Search Results !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली 'त्या' कुटुंबियांची भेट


दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे दिलं आश्वासन 

सोलापूर : एकतर्फी प्रेम, त्याआडून होणारं ब्लॅकमेलिंग, फसवणूक, विश्वासघात, अन् बदनामी त्यातून होणारा मनस्ताप अशा वेगवेगळ्या कारणातून वेगळ्या घटनात दोघींनी आत्महत्या केल्या. या घटनांमुळं सोलापूर शहर हादरलं असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनांची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी दुपारी, पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली. चाकणकर यांनी पोलीस तपास अतिशय योग्य दिशेने होत असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाची पाठ थोपटलीय. या वेगवेगळ्या घटनात, दाखल गुन्ह्यात किती आरोपी अटकेत असून किती हात पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत हा प्रश्न अनुत्तरीत असताना ' पाठराखण ' हा चर्चेचा विषय ठरलाय.


मंगळवारी सायंकाळी ०४ वाजता चाकणकर या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. लग्नाच्या दिवशीच इहलोकाचा निरोप घेतलेल्या सालिया शेख व शाळा संस्थापक, शिक्षक आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या जीवनाला पूर्णविराम दिलेल्या अस्मिता कोळी या विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची चाकणकर यांनी भेट घेतली. शेख यांच्या घरासमोरच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर या बोलत होत्या.



राज्य महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांच्याकडं आरोपींना कठोर शासन व्हावं व आम्हाला न्याय मिळावा, अशी विनंती कोळी व शेख यांच्या कुटुंबीयांनी केली. यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेख व कोळी कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

चाकणकर यांनी सोलापुरात आल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची पोलीस मुख्यालयामध्ये भेट घेऊन चर्चा केली. शेख व कोळी या दोन आत्महत्या केलेल्या मुलीच्या घटनेचा सखोल आणि  वेगाने तपास करून त्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना केल्या.

यावेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने ,पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. दिपाली काळे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष  पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, सोशल वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, बसवराज कोळी, दशरथ शेंडगे, अनिल बनसोडे, करण गुंडगी, महिला आघाङीतील शशिकला कस्पटे, अनिता वाघमारे, रंजना धुमाळ, कल्पना सुनकद, ज्योती सोनटक्के, ज्योती मानवे उपस्थित होते.


..........  चौकट ........... 

पालक आणि मुलं यांच्यामधील संवाद 

हरवत चालला आहे : रूपाली चाकणकर

सोलापूर प्रतिनिधी : हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये मोबाईल हा सर्वस्वी झाला असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमधील (मुलं) संवाद हरवत चालल्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. वास्तविक पाहता पालकांनी मुलांना समजावून घेणे गरजेचे असल्याचे मत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले..

....... चौकट ........

बलात्कार अन् विनयभंग घटनांत वाढ

सोलापूर शहरांमध्ये पूर्वी ३०२, मारामारी अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. त्या घटना आता कमी झाल्या असल्या तरी बलात्कार आणि विनयभंग या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.