२६ वर्ष उलटली... ! सेवेत कायम न केल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत रोजंदारी करीत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ वर्ष उलटली तरी सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या मलेरिया रोजंदारी औषध फवारणी क्षेत्र कार्यकर्ता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय उलटण्याअगोदर सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी सोमनाथ संदिपान मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी, ०७ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलंय.
सोलापूर महानगरपालिकेने सोलापुरातील एका दैनिकात, ०४ ऑगस्ट, १९९७ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून झाडूवाला झाडूवाली आणि क्षेत्र कार्यकर्ता या पदासाठी एक नियम एका अटीवर रोजंदारी वेतनावर कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यापैकी झाडूवाला- झाडूवाली रोजंदारी १२० रोजंदारी कर्मचाऱ्यांना २००८ मध्ये तर एम. पी. डब्ल्यू. १२ रोजंदारी कर्मचाऱ्यांना २०१३ पासून सेवेत कायम करण्यात आले, मात्र क्षेत्र कार्यकर्ता म्हणून काम करीत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आजपर्यंत सेवेत कायम करण्यात आलेले नाही.
गेली २६ वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप रोजंदारीवरच काम करावे लागत आहे. रोजंदारीवर काम करीत असलेल्या औषध फवारणी क्षेत्र कार्यकर्ता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश मिळावेत, यासाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसणार असल्याची नोटीस सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त, यांना दिले, मात्र त्यांचा प्रश्न निकाली न निघाल्याने या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
सिद्धेश्वर माने, सोमनाथ मोरे, योगेश माने, संजय सरवदे, विद्याधर प्रक्षाळे, बालाजी आलुरे, शरद लोंढे, राजू अलकुंटे, प्रताप उघडे, महेंद्र भिडे, अनिल शिवशरण, महेश कदम, श्रीशैल राजमाने, रामदास शिंदे, विजय पवार आणि देविदास फुले यांच्यासह अन्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.