सोलापूर : टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमावर बंदी घाला आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने गुरूवारी पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांच्याकडं निवेदन देऊन केलीय.
गाजिउद्दीन रिसर्च सेंटर, संस्थेने सोलापुरात शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात 'मुसलमानों की तारीख और टिपू सुलतान की बदनामी : एक फॅसिस्ट साजिश' नामक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात टिपू सुलतान याचे उदात्तीकरण होणार आहे, असे वाटलेल्या पत्रकावरून दिसून येत आहे, असं भा.ज.यु.मो. च मत आहे.
टिपू सुलतानने लिहिलेल्या पत्रांचे मराठी भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, राम पुनियानी यांच्या आर.एस.एस. भाजपा विचारधारा और राजनीतिक अजेंडा नामक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच राम पुनियानींचं 'भाजप प्रणित टिपू सुलतान यांची बदनामी व वास्तव' अशा वादग्रस्त विषयावर व्याख्यान अन् 'भाजपाच्या विद्वेषी राजकारणाचा सांस्कृतिक आधार व भारतीय इतिहास' या विषयावर राजू परुळेकर बोलणार आहे. या कार्यक्रमावर बंदी घातली गेली नाही, तर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी-कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावतील, असा इशाराही गुरुवारी भा. ज. यु. मो. च्या कार्यकर्त्यांनी दिला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनप्रसंगी भाजयुमो शहर सरचिटणीस पंकज काटकर, रवी कोटमाळे, शिवराज झुंजे, नागेश येळमेली, प्रेम भोगडे, नरेंद्र पिसे, संस्कार नरोटे, समर्थ होटकर आदींसह सोलापूर शहर भाजयुमोचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.