महिला सबलीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं
कार्य कौतुकास्पद : आमदार सचिन कल्याणशेट्टी
कासेगाव : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे धोरण हे महिला उन्नतीकरणासाठी आहे. त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा नारा दिला. आज महिला स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाचं जीवन जगत आहेत. महिला सबलीकरणासाठी मोदी यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर, पंचायत समिती दक्षिण सोलापूर अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष दक्षिण सोलापूर यांच्यामार्फत यशोदीप महिला प्रभाग संघाने आयोजित केलेल्या कासेगाव येथील वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ही महिला सबलीकरण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. महिलांना प्रवासात अडचण होऊ नये, म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली. उज्वला गॅसच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेड्या-पाड्यामध्ये घरा-घरापर्यंत गॅस पोहोचवला. प्रत्येक बाबतीत महिलांना केंद्रबिंदू मानून महिला सबलीकरणासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी खूप मोठी कामे केली आहेत. आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण दिल्यामुळे येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये या महिला नेतृत्व करतील, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
एखाद्या संस्थेचे भविष्य हे त्या सभासदांच्या एकीवरून ठरत असते. त्यांचे काम किती चांगले आहे, संस्था किती नफ्यात आहे. हेही त्यांच्या एकीकरणावरून ठरते. संस्था ही सामुहिक व सामाजिक कार्यातून उभा राहत असते. त्यामुळे बोरामणी प्रभाग संघातील यशोदीप महिला प्रभाग संघाचं छोटसं रोपट हे वटवृक्षात रुपांतर झाल्याचं पाहून खूप समाधान असल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यावेळी सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले.तालुका अभियान व्यवस्थापक पुनम कोनापुरे वार्षिक अहवालाचं वाचन केले.
यावेळी सुधीर ठोंबरे (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी), सचिन चवरे (जिल्हा अभियान, व्यवस्थापक), राजकुमार मोरे (कृषी उपसंचालक, कृषी विभाग सोलापूर), पुनम कोनापुरे (तालुका अभियान, व्यवस्थापक), दिगंबर साळुंखे (एम आय एस), प्रमोद चिंचोरे (आय बी सी बी), अप्पू परमशेट्टी (दुधनी), यशपाल वाडकर (सरपंच, कासेगांव), दिलीप चौगुले (संस्थापक-बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला, कासेगाव), प्रशांत जाधव (सरपंच, गंगेवाडी), वैभव हलसगे (उपसरपंच, बोरामणी), सोमनाथ गड्डू पटणे, सिद्धाराम हेले (माजी सरपंच, तांदुळवाडी), सदाशिव चौगुले, शिवराज जाधव (मुळेगाव), दत्ता खंडागळे (उळे), सिताराम राठोड (माजी सरपंच, बक्षी हिप्परगा), किशोर मुळे, प्रवीण चौगुले (तालुका उपाध्यक्ष, युवा मोर्चा), सुभाष येणगुरे, सागर खांडेकर, प्रकाश पांगरकर, बोरामणी जिल्हा परिषद गटातील यशोदीप महिला प्रभाग संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.