Type Here to Get Search Results !

चाकणकर यांना अध्यक्ष पदावरून करावं पायऊतार : संभाजी ब्रिगेड


चाकणकर यांना अध्यक्ष पदावरून करावं पायऊतार : संभाजी ब्रिगेड

सोलापूर : महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सम्राट बळीराजा यांचं सोशल मीडियावर काल्पनिक पोस्ट शेअर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना महिला आयोग अध्यक्ष पदावरून पायऊतार करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोमवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडं करण्यात आलीय. 

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमधील शेतकरी वर्ग, सम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या शेतामध्ये बळीचे पूजन करतो. इतिहास काळात या बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारल्याचे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या गुलामगिरी ग्रंथात सिद्ध केले आहे, असे असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, १४ नोव्हेंबर रोजी फेसबुक या सोशल माध्यमावर बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित करुन तमाम मराठा, बहुजन शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी संभाजी ब्रिगेडची एकमेव मागणी आहे. 


त्यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता, चाकणकर या आपल्या महिला आयोग या संविधानात्मक पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणून खोटी माहिती देत प्रश्न विचारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा दबाव टाकत असल्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्यात यावे, तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलीय.


यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, ज्योतिबा गुंड, रमेश चव्हाण, शुभम थिटे, शेखर कंटीकर, नागनाथ कोरे, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.