कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील रमाबाई आंबेडकर आश्रम शाळेच्या मैदानावर रविवारी सुरु झालेल्या कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धेत अनुक्रमे ए. एम. स्पोर्ट्स, डोणज व दक्षिण सोलापूर खो-खो असोसिएशनने विजयी सलामी दिली.
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने दक्षिण सोलापूर तालुका खो-खो असोसिएशन आणि रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती निवासी व अनिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा निंबर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
सलामीच्या सामन्यात कुमार गटात डोणजने नागणसूरच्या समृद्धी स्पोर्ट्स क्लबवर १२-६ असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. मुलींच्या गटात मध्यंतराच्या ३-४ अश्या पिछाडीवरून दक्षिण सोलापूर खो-खो असोसिएशनने मंद्रुपच्या न्यू गोल्डन क्लबवर ९-७ अशी मात केली.
बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार, सर फाउंडेशन राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे यांनी यावेळी भेट दिली. उपस्थितांचे स्वागत संयोजक सिद्धाराम वाघ यांनी केले. संयोजक तुळशीराम शेतसंदी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, पंच मंडळ सचिव गोकुळ कांबळे, निवड समिती सदस्य राजाराम शितोळे, धोंडीराम पाटील, संतोष कदम, असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र नाशिककर, रमेश बसाटे, प्रिया पवार, सुरेश भोसले, गुलाम मुजावर, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, अजित शिंदे, शिवशंकर राठोड, सोनाली केत, शरद व्हनकडे, सोमनाथ बनसोडे आदी उपस्थित होते.
------