माझ्याकडे का बघितला, असा जाब विचारत झालेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी; त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर: माझ्याकडे का बघितला असा जाब विचारत, त्रिकूटाने एका तरुणास बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली हा प्रकार राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी दुपारी घडला. सुनील अशोक पंगूडवाले असं जखमीचं नांव आहे. याप्रकरणी हर्षल जाधव याच्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील मोरारजी पेठ, मंगळवेढेकर चाळीतील रहिवासी सुनिल अशोक पंगूडवाले (वय-४० वर्षे), त्यांचे मामा ससाणे यांना भेटून घराकडे जात होते. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात असताना सार्वजनिक रस्त्यावर थांबलेल्या हर्षल जाधव याने 'माझ्याकडे का बघतो' असे म्हटले. त्यावर सुनील पंगुडवाले यांनी त्यास मी तुझ्याकडे बघत नाही, असे सांगितले.
त्यावेळी हर्षल जाधव याने पंगुडवाले याला थांबवून शिवीगाळी करीत, त्यांचे मोबाईलवरून फोन करून कोणास तरी बोलावून घेतले. त्यांनतर त्या ठिकाणी बुलेट गाडीवर विक्रांत जाधव (रा-दोघे धरमशी लाईन एस. टी. स्टॅन्डसमोर सोलापूर) आणि एक अनोळखी तरूण तेथे आले.
त्यांनी सुनीलला शिवीगाळ करून विक्रांत जाधव याने त्याचे खिशातून एक लोखंडी फायटर काढले. आज याला खल्लास करतो असे म्हणत, हर्षल जाधव आणि अनोळखी इसमाने सुनीलचे हात पकडले व विक्रांत जाधव याने लोखंडी फायटरने उजवे डोळ्याजवळ मारून गंभीर जखमी केले. त्यात तो चक्कर येऊन खाली पडला तरीही त्या तिघांनी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून 'मेला का बघ, रे' असे म्हणून तेथून पळ काढला.
याप्रकरणी जखमी सुनील पंगुडवाले याच्या फिर्यादीनुसार फौजदार चवळी पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.