ऐकावे ते नवलच... ! चित्रपटातल्या विहीर चोरीनंतर वास्तवात 'या' तालुक्यात गेली व्यायाम शाळा चोरीला
सोलापूर : ऐकावे ते नवलच... विहीर चोरीला गेल्याच्या किस्सा 'जाऊ तिथं खाऊ' या मराठी चित्रपटानं सुंदरपणे रेखाटला होता. त्यात मकरंद अनासपुरे यांच्या रूपानं अभिनेता म्हणून समाजात घडणाऱ्या अप-प्रवृत्तीवर बोट ठेवले होते. समाजात वास्तविकपणे अशा अनेक घटना घडतात आणि 'फाईल बंद' होतात. अशीच एक घटना माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथे घडली असून तिथं उद्याचे बलवान घडविणारी ' तालीम ' चोरीला गेलीय, या प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कळसाईत दाम्पत्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारपासून आंदोलन सुरू केलंय.
माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील व्यायाम शाळा चोरीला गेल्याप्रश्नीची तक्रार करून ग्रामपंचायत सदस्या वैशाली दादासाहेब कळसाईत व त्यांचे पती दादासाहेब कळसाईत दाम्पत्यांनं स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर २२ मार्च २०२१ रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी कुर्डूवाडी चे उपविभागीय अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना व्यायाम शाळा चोरी प्रकरणी चौकशीचे आदेश देऊनही त्यांनी पाहणी करण्यास टाळाटाळ केली.
.त्यावर कळसाईत दाम्पत्यांनी माहितीचा अधिकार अन्वये हरिदास माने वस्तीवरील व्यायाम शाळेसंबंधी विचारणा केली असता, ग्रामपंचायत नमुना आठ, दफ्तर मध्ये नोंद आढळून येत नाही. तरी सुध्दा त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उभयतांनी गटविकास अधिकारी, कुर्डूवाडी यांचे कार्यालयासमोर, २९ जुलै२०२१ रोजी आमरण उपोषण केले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी रेपाळ, ग्रामसेवक व बांधकाम विभागाचे नायकोडे (शाखा अभियंता) यांना टाकळी येथील व्यायाम शाळेच्या चौकशीसाठी पाठवण्यात आले.
त्यावेळी त्यांनी माने वस्ती टाकळी येथे जाऊन हरिदास वसंत माने या व्यक्तीनं स्वतःच्या शेतीमध्ये बांधलेल्या ०२ मजली घराची पाहणी करून त्या इमारतीला व्यायाम शाळा असल्याचा खोटा अहवाल सादर करून शासनाची फसवणूक केली. त्यावेळी माधुरी हरिदास माने हे सरपंच असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून हेच आमचे घर 'व्यायाम शाळा' म्हणून दाखवा, असे म्हटल्याची गावभर चर्चा आहे.
त्यांनी माने वस्तीवरील हरिदास वसंत माने गटविकास अधिकारी साहेब कुर्डूवाडी यांना शाखा अभियंता नायकुडे यांनी चुकीचा, खोटा व दिशाभूल करणारा अहवाल सादर केला. त्या व्यायाम शाळेचे पूर्ण बिल १५ सप्टेंबर २०१८ रोजी अधिकाऱ्यांच्या संगनमताने काढण्यात आले, असल्याचे दादासाहेब कळसाईत यांनी आंदोलनस्थळी सांगितले.
त्यातच ग्रामपंचायतीने आजतागायत त्या व्यायामशाळेचा ताबा घेतलेला नाही. व्यायामशाळा बांधली नाही, त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत दप्तरी ताबा घेतलेला नाही.
या प्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यासमोर सुनावणी चालू असताना व्यायाम शाळा आणि वर्ग करून बांधलेली आहे, असे कबुल केले असून असे स्वतः सांगितले असून त्याचे व्ही.डी.ओ. शुटींग सुध्दा उपलब्ध असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
शासनास खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन दिशाभूल केलेली आहे. शासनाच्या पैशाचा गैरवापर करुन शासनाचे आर्थिक नुकसान केले असताना प्रशासनाकडून जाणून-बुजून दुर्लक्ष होत असल्याची दादासाहेब कळसाईत यांची तक्रार आहे. मात्र आज पर्यंत त्या व्यायाम शाळेचा प्रश्न जणू चोरी झाल्यासारखा असून या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी कळसाईत कुटुंबीयांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केलं आहे.