कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी पदं भरा यासह अन्य मागण्यांसाठी 'वंचित' चे आंदोलन
सोलापूर : महाराष्ट्र शासनाचा कंत्राटी भरती रद्द जीआर असूनही महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ, सोलापूर कार्यालयातील कंत्राटी भरती तात्काळ रद्द करून कायमस्वरूपी पद भरण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस सुरज अरखराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी निदर्शने करून एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर ०७ दिवसाच्या आत नोंदणी होणे आवश्यक असताना किमान ०३ ते ०४ महिने इतका कालावधी नोंदणीसाठी लागतो, या मधल्या काळात कामगाराच्या जीवितास काही अघटित घडल्यास त्यास कोण जबाबदार असणार आहे, असा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या सवाल आहे.
महाराष्ट्र शासनाने मध्यान्ह भोजन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असल्या कारणाने ही योजना बंद केली. सोलापूर जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचा वंचित बहुजन आघाडी जनरल कामगार युनियनचा आरोप आहे. या भ्रष्टाचाराची निवृत्त न्यायाधीशामार्फत समिती गठित करून चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना गजाळ करण्यात यावी अशी ही मागणी आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्न महाविद्यालयामधील नेट/सेट, अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून ३३ प्राध्यापकांनी नोकऱ्या मिळवल्याचे उघडकीस आलं आहे. राज्यातील अन्य विद्यापीठाबरोबर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या बोगस प्राध्यापक भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. याचबरोबर लाड-पागे समिती पूर्ववत लागू करावी, सोलापूर मनपा आरोग्य खात्यातील ३०० बदली कामगारांना कायम करण्यात यावे, जिल्हा परिषद नवीन भरती वेतनश्रेणीवर लागू करावी, विडी कामगार यांचे जन्मतारीख पुरावे नसल्याने पीएफ व पेन्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे, यासह एकूण ११ मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, कामगार संघटना जिल्हा सरचिटणीस सुरज अरखराव, प्रशांत गोणेवार, पांडुरंग खांडेकर, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, श्वेता राजगुरू, पल्लवी सुरवसे, बाबुराव सावंत, राजा सोनकांबळे, जालिंदर चंदनशिवे, रवी थोरात, प्रेमराज कापुरे, संदीप माने, विजय गायकवाड, सुजाता शेंडगे, वैभव सोनवले आणि सुरेश देशमुख उपस्थित होते.