याची घ्यावी दक्षता : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांअंतर्गत सन २०२३-२४ साठीच्या मंजूर आराखड्यातील कामांच्या निधीचा पुरेपूर विनीयोग करण्यात यावा. उपलब्ध होणारा निधी अखर्चित राहू नये याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक सोमवारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार, उपवन संरक्षक धीरज पाटील, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार जिल्ह्यासाठी ५९० कोटी रुपयांची तरतूद आहे. सन २०२२-२३ च्या कामांचे दायित्व १५६.६७ कोटी एवढे आहे. यासाठी प्राप्त तरतूद ४१३ कोटी एवढी आहे. विहित मुदतीत १०० टक्के निधी मार्च २०२४ अखेरीस खर्ची पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी प्रयत्न करावेत.
यावेळी बैठकीत जिल्हा परिषद, नगर विकास, वन विभाग, जलसंधारण, नगर विकास, पोलीस प्रशासन आदी विभागांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.